Sunday, 10 September 2017

पुरोगाम्यांचा एकांगी विलाप

सावधान, रात्र वैऱ्याची आहे...

पुरोगाम्यांचा एकांगी विलाप


 महाराष्ट्रासह देशभरातील पुरोगामी सध्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल प्रचंड विलाप करीत आहेत. त्या विलापामागे दु:ख कमी आणि सूडाचीच भावना जास्त असा सारा प्रकार आहे. कारण यामागे सूडभावना नसती तर लागलीच त्यांनी हिंदुत्ववाद्यांना टीकेचे लक्ष्य केले नसते. पण तो त्यांचा जन्मजात गुण आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनीच आता अधिक सजग रहायला हवे. रात्र वैऱ्याची आहे. गौरी लंकेश यांच्या निधनाबद्दल पुरोगाम्यांचा एकांगी विलाप चालू आहे. 



   कर्नाटकातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लंकेश पत्रिका ’ या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची नुकतीच हत्या झाली. त्यादिवशी अनंत चतुर्दशी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये गणेश विसर्जनाची गडबड सुरू होती. त्यामुळे तसे पाहिले तर महाराष्ट्रात का होईना ही बातमी जरा उशीराच कळली. तोपर्यंत स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गळे काढण्यास सुरूवातही केली होती. एखाद्या व्यक्तीची हत्या होणे हे दुर्दैवीच आहे. परंतु त्या मेलेल्या माणसाचे निमित्त करून तिच्या चितेवर आपली पोळी भाजून घेणे हेही तितकेच समाजद्रोही आहे. नेमके हेच काम गौरी यांच्या हत्येनंतरही चालूच आहे. ज्याप्रमाणे गिधाडे एखाद्या जनावराच्या मरणाची वाट पहात असतात तद्वत ही पुरोगामी मंडळी एखाद्या विचारवंताची हत्या होते कधी आणि आम्ही हिंदुत्ववाद्यांना जबाबदार धरतो कधी याचीच वाट पहात असतात. गौरी यांच्या बाबतीतही हेच घडून येत आहे. ही हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली आहे असा बिनबुडाचा आरोप करण्यास या मंडळींनी सुरूवातही केली आहे. 
   कोणत्याही हत्येचं समर्थन होऊच शकत नाही. कोणतीही हत्या ही हत्याच असते. मग ती पुरोगाम्यांची असो अगर प्रतिगाम्यांची. हत्येने माणूस संपतो, विचार नाही. मुद्दा असा की, गौरी यांच्या हत्येनंतर समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यामध्ये पुरोगाम्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केल्याचे दिसताच हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या  अनेक पोस्ट या माध्यमांवर फिरल्या. या प्रतिक्रिया निश्चितच हिंदुत्ववाद्यांना अभिमानास्पद वाटत असतीलही. परंतु याचेच भांडवल करीत ही पुरोगामी मंडळी गावभर नाचत सुटली आहेत. त्यांना गौरी यांच्या हत्येबद्दल काहीही सोयरसुतक नाहीये. केवळ गौरी यांच्या हत्येचे निमित्त करून हिंदुत्ववादी विचारांना झोडपायचे आहे. त्यांचे हे स्वप्न सोशल मिडीयावरचे हिंदुत्ववादी विचारवंत आपल्या प्रतिक्रियांतून आयतेच पूर्ण करीत आहेत. त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदुत्ववाद्यांनो सावधान रात्र  वैऱ्याची आहे. 
स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे गौरी यांच्या हत्येवर हसत असतील तर तीही विकृतीच नाही काय? म्हणजे पुरोगाम्यांनी गाय मारली म्हणून हिंदुत्ववाद्यांनी वासरू मारण्यासारखे नव्हे काय? असे असेल तर या विकृतीला हिंदुत्ववाद्यांचे आवरण लावू नका कारण तुम्हाला हिंदु या शब्दाची व्याख्याच कळली नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आपल्या या अशा कृतीमुळे सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जाते. मग तो मालेगावचा बॉम्बस्फोट असो,किंवा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या असोत.या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम केलेच ना? हेच तंत्र पुरोगामी तुमच्या या अशा कृतीतून गौरी हत्या प्रकरणात वापरत आहेत.  अशा विकृत आनंदाच्या पोस्ट टाकून त्यांच्या हाती आयते कोलीत का द्यायचे? 
   
मुळात एक लक्षात घेतले पाहिजे की, लोकशाहीची हत्या झाली म्हणून उर बडवणाऱ्या  या पुरोगाम्यांना दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्याबरोबरच गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास लागणे नकोच आहे. केवळ साप साप म्हणून भुई धोपटण्यातच त्यांना स्वारस्य आहे. त्यामुळेच देशभरात कुठेही हिंदुत्ववादी सोडून अन्य कोणत्याही विचारसरणीच्या व्यक्तीची हत्या झाल्यास  विचारांवर हल्ला झाला अशी ते बोंब ठोकतात. हिंदुत्ववादी हा त्यांच्या लेखी विचार नसतोच. त्याचमुळे केरळमध्ये संघस्वयंसेवकांच्या हत्या होऊनही साधा निषेधाचा एक सूरही उमटला नाही. यासाठीच हिंदुत्ववाद्यांनीही हिंदुसंघटना बदनाम होतील असे कोणतेही कृत्य करू नये. याउलट गौरी यांचा खूनी लवकरात लवकर पकडला जावा यासाठी आवाज उठवावा. जेणेकरून तपासही योग्य दिशेने होईल आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या  पुरोगाम्यांचा आवाजही बसेल. अन्यथा पुरोगाम्यांचा एकांगी विलाप सुरूच राहील.

                                                                                – शशांक सिनकर


Thursday, 13 July 2017

अतिउत्साही आचरटपणा

फेसबुक ‘लाईव्ह’, आयुष्य ‘डेड’


    अतिउत्साही आचरटपणा 

   
   प्रीती भिसे नामक एका सतरा वर्षीय युवतीचा मरीन ड्राइव्ह येथे सेल्फी काढताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. आणि त्यानंतर सेल्फी काढताना दुर्घटना घडल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. ही श्रृंखला कुठेतरी तुटावी अशी अपेक्षा असतानाच नागपूरातील वेण्णा सरोवरात आठजण बुडाल्याची बातमी धडकली. विशेष म्हणजे हे सर्वजण सेल्फीच काढत होते. फेसबुक ‘लाईव्ह’ करताना आयुष्यच ‘डेड’ झाले त्याचं काय? असला आचरटपणा करताना सर्वांची कुटुंबे उघड्यावर पडली.  तरूणांचं हे ‘सेल्फी’वेड समाजाला घातक तर ठरत नाहीये ना?...
   

 स्वामी विवेकानंदांनी असे म्हटले होते की, मला देशप्रेमाने भारलेले असे केवळ शंभर तरूण द्या, मी हा देश बदलून दाखवेन. सध्याच्या पंतप्रधानांचाही भरवसा युवा पिढीवर जरा जास्तच आहे. देशातील युवकांची संख्या जास्त आहे म्हणून हा देश तरूण असे समीकरण मांडले जात आहे. हे जरी कितीही खरे असले तरीही युवकांना याबाबत काय वाटते हाच खरा मुद्दा आहे. तरुणांची स्वप्ने, त्यांचे आदर्श, त्यांचे विचार हे सर्वच काही एका भक्कम मजबूत अशा साखळदंडाने बांधले आहेत की काय अशी सध्या परिस्थिती आहे. ‘मोबाईल’ नावाचा हाच तो साखळदंड आहे. या मोबाईलमुळे जग जवळ आले असे म्हणतात. परंतु माणसे दुरावत चालली. आजचे युवक एकमेकांशी बोलत नाहीत ते आपला संदेश मोबाईलवर पाठवतात. त्यांच्यात स्पर्धा आहे परंतु ती निकोप नाही. त्यांच्यात असते ती फक्त चढाओढ. मी सर्वांत पुढे असावे अशी प्रत्येक तरुणाचीच धारणा असते. ती काही चुकीची नाही. परंतु केवळ पुढे असून काय उपयोग? त्याने काही जीवनात फरक पडणार आहे का? अशी स्पर्धा जर एखाद्याचा जीव घेणार असेल तर अशी स्पर्धा हवीच कशाला?
    सध्या तरुणाईच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. पूर्वी शिक्षणाच्या संधी फार नसल्यामुळे विद्यार्थी आपल्या घरीच राहून जवळपासच्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असे. त्याचा फायदा असा होत असे की, त्यांच्या आईवडिलांना, पालकांना आपल्या पाल्यावर लक्ष ठेवता येत असे. परंतु आता शिक्षणाची दारे सताड उघडली.  जगाची क्षितिजे या नवतरुणांना खुणावू लागली. त्यामुळे आपोआपच शिक्षणानिमित्त घराबाहेर राहणे आले. त्यामुळे निरनिराळ्या प्रांतातील विद्यार्थी एकत्र राहू लागल्याने प्रत्येकाची संस्कृती, परंपरा जोपासण्याचा कल वाढू लागला. हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की, या सर्व वातावरणातून मग आठवड्यातून ‘पिकनिक’ची संकल्पना पुढे आली. पूर्वी सहली निघायच्या त्यामध्ये काहीतरी शिकण्याचा, नवीन पाहण्याचा उद्देश असे.परंतु या ‘पिकनिक’ मधून नवीन काही नाही. ना नवे शोध, ना नवे शिक्षण! केवळ आठवडाभर शिक्षण घेतल्यामुळे किंवा काम केल्यामुळे आलेला थकवा दूर करावा एवढाच त्यामागचा उद्देश. हल्ली तरुण म्हणजे ‘उत्साह’ आणि तरुणाई म्हणजे ‘दांडगाई’ एवढेच अर्थ अभिप्रेत आहेत. कामाचा शीण आला म्हणून ‘पिकनिक’ आणि ‘पिकनिक’ आहे म्हणून उत्साह असे समीकरण सध्या चालू आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की, तरुणांच्या मजेच्या व्याख्या बदलल्यामुळे आपण करू तीच मजा असे त्यांना वाटू लागले आहे. मग आपली मजा इतरांना सांगण्यासाठी अतितत्पर मेसेज सेवा आहेच. आतातर तंत्रज्ञान एवढे पुढारले आहे की, तुम्ही केलेला व्हिडीओ सुद्धा तुम्ही सातासमुद्रापार असलेल्या आपल्या मित्रांना शेअर करू शकता. मग काय तरूणाई लागली कामाला. आपण पिकनिकसाठी कुठे गेलो, काय केलं, काय खाल्ले हे सर्व शुटींग करून व्हॉटसअप किंवा फेसबुकवर ‘लाईव्ह’ शेअर करायचे. आणि आपण शेअर केलेले फोटो किती जणांना आवडले याचा हिशोब करत बसायचे. ते सुद्धा काही क्षणार्धात. आपण जर चुटकीसरशी हे करू शकलो नाही तर बेचैन होणारी मुले अनेक ठिकाणी दिसतात.
    यामध्ये भर पडली आहे ती सेल्फी या प्रकाराची. ‘सेल्फी’ म्हणजे स्वत:चा फोटो स्वत:च काढायचा. यातून म्हणे एक प्रकारचा विलक्षण आनंद मिळतो. परंतु खरंतर हा एक प्रकारचा आचरटपणाच आहे. या तंत्रज्ञानाचा आपण कशाप्रकारे वापर करायचा हे आपल्याला समजायला हवे. आपले सेल्फी इतरांनी का म्हणून पहायचे? आपण काहीतरी विलक्षण मोठे काम केले असे तर या तरूणाईला सुचवायचे नसते ना? बरे धोकादायक ठिकाणीच ही सेल्फी काढायची अवदसा कोठून येते? दरीच्या काठावर, धबधब्यात किंवा  समुद्रात असे सेल्फी काढल्याने कोणता आनंद मिळतो?
    प्रीती भिसे नामक एका सतरा वर्षीय युवतीचा मरीन ड्राइव्ह येथे सेल्फी काढताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. आणि त्यानंतर सेल्फी काढताना दुर्घटना घडल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. ही श्रृंखला कुठेतरी तुटावी अशी अपेक्षा असतानाच नागपूरातील वेण्णा सरोवरात आठजण बुडाल्याची बातमी धडकली. विशेष म्हणजे हे सर्वजण सेल्फीच काढत होते. ते होडीतून करत असलेला प्रवास त्यांना फेसबुकवर ‘लाईव्ह ’ करायचा होता. परंतु या लाईव्हच्या नादात आयुष्यच ‘डेड’ झाले त्याचे काय? तरूणांच्या आनंदाच्या, सुखाच्या कल्पनाच बदलल्याचे यातून दिसून येते. कुणीतरी मग नैराश्य आले म्हणून सेल्फी काढत आत्महत्या करतो, तर कुणी आपल्या अत्याचाराचा फेसबुकवर बाजार मांडतो. तरूणांपुढे चुकीचेच आदर्श आपण निर्माण केल्यामुळेच आजची पिढी भरकटत चालली आहे. तांत्रिकदृष्ट्या ‘लाईव्ह’ राहण्याच्या नादात आपले खरेखुरे किंमती आयुष्यच ‘डेड’ करायचे याला अतिउत्साहाचा आचरटपणा म्हणायचे नाहीतर काय?

                                                                                                                                        -- शशांक सिनकर

 

Sunday, 4 June 2017

ध्येपथावरील दीप निमाला

ध्येपथावरील दीप निमाला


‘‘ की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ’’ स्वातंत्र्यलढ्याप्रती स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार पत्रकारितेतही ज्यांनी काटेकोरपणे जपले, असे दैनिक सागरचे संपादक ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब जोशी यांचे शनिवारी देहावसान झाले. एक सेवाव्रती, तपस्वी, निगर्वी मार्गदर्शक  हरपल्याची तमाम कोकणवासियांची भावना झाली. आमच्या सारख्या शेकडो तरूण पत्रकारांना ज्यांनी नेकीचा मार्ग  दाखवला, त्या ध्येयपथावरील दीपच आज निमाला...



शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास वार्तांकनासाठी एका कार्यक्रमाला निघालो असता पत्रकार मित्राचा फोन आला. अरे आपले नाना गेले. ‘‘नाना गेले’’ एवढेच शब्द कानात गेले. उवंरित संभाषण ऐकू  आलेच नाही. खरंच नाना गेले?... चारच दिवसांपूर्वी ते आजारी असल्याचं कळलं होतं. मुंबईतील विश्व संवाद केंद्र या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने दरवषीं दिला जाणारा ‘महर्षी नारद पुरस्कार’ यावषीं दैनिक सागरचे सह संपादक श्री.भालचंद्र दिवाडकर सरांना नुकताच एका कार्यक्रमात देण्यात आला.त्यावेळी सागरचाही गौरव झाला. यावेळी दिवाडकर सरांजवळ बोलताना नानांची विचारपूस केली. सवं काही क्षेम असल्याचं त्यावेळी दिवाडकर सरांनी सांगितलं. या आमच्या संभाषणाला जेमतेम आठवडा उलटला असेल तोच नाना गेल्याची बातमी धडकली. क्षणभर विश्वास बसेना, पण कटू असलं तरी ते सत्य होतं. क्षणात मन इतिहासात गेलं. दहा वर्षांपूर्वी नानांच्या संपर्कात आलेला मी  आज मुंबईत पत्रकारिता करू लागलो. त्यावेळी नानांनी आखून दिलेला मार्ग  किती खडतर आहे हे जाणवतं. पत्रकारीता क्षेत्रात पदार्पण केले त्यावेळी नानांनी आम्हाला पत्रकारीतेची मूल्यं, पत्रकारीतेतील संकेत समजावून सांगितले. जे कायमच आम्हा तरूण पत्रकारांना कायमच मार्गदर्शक  ठरत आले आहेत.
पन्नास वर्षांपूवीं चिपळूण सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून ‘सागर’ नावाचं दैनिक काढणं हीच मोठी अशक्यप्राय गेष्ट होती. परंतु नानांचा व्यासंग, सर्वच क्षेत्रातील त्यांचा संचार, विशेषत: देवी सरस्वतीचा असलेला त्यांच्यावर असलेला वरदहस्त, अपार कष्ट उपसण्याची तयारी अन् एका ध्येयाने प्रेरित होऊन केलेली वाटचाल यामुळे दैनिक सागर कोकण वासियांचं मुखपत्र बनलं.नानांचं कोकणावर असलेलं  जीवापाड प्रेम,इथल्या युवकांनी सुशिक्षित होण्यासाठी केलेली धडपड, कोकणात उद्योगधंदे कसे वाढीस लागतील यासाठी सरकार दरबारी केलेला पाठपुरावा, कोकणच्या सर्वांंगिण विकासासाठी ‘‘ कोकण वैधानिक विकास महामंडळा’’साठी सततचा धरलेला आग्रह कोकणवासियांनी जवळून अनुभवला आहे. कोकणवर अफाट प्रेम असलं तरीही नाना कधीही प्रांतवादी नव्हते. कोकणात असलेलं टॅलेण्ट जगासमोर आलं पाहिजे एवढाच त्यांचा ध्यास होता.कोकणातील आम्हा तरूणांना म्हणूनच ते ‘दीपस्तंभ’ वाटतात. आज नानांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने निश्चितपणे कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेची हानी झाली आहे. पत्रकारिता हाच ज्यांचा श्वास अन् ध्यास होता अशा व्यासंगी पत्रकाराला आज महाराष्ट्र मुकला आहे.
वृत्तीने धर्मनिरपेक्ष असूनही सर्वच  धर्मांचा त्यांचा अभ्यास होता.त्यामुळे सर्वच धर्मांच्या कार्यक्रमामध्ये नानांना आदराचं स्थान होतं. असे असले तरीही भगवद् गीतेवर त्यांचा जास्तच जीव होता. गीतेतील सारानुसार जगण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न असे.अनेकदा त्यांच्या बोलण्यातून तो व्यक्त होत असे.त्यामुळे भगवद् गीतेतील तत्वज्ञानाप्रमाणे नानांचे इहलोकीतून जाणे ही ईश्वराचीच योजना आहे. ‘‘ वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृहणति नरोे पराणि , तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही’’ या गीतेतील वचनानुसार देहाला सोडून प्राण गेला असला तरी नानांचे  विचार नेहमीच आम्हाला मार्गदर्शक ठरतील.

                                                                                                                                   - शशांक सिनकर
                                       
                                                                                                                       पत्रकार, दैनिक सामना, मुंबई

Wednesday, 3 May 2017

आजही सीतेने अग्निदिव्य करावे का?

 पैशाची लालसा, खोटी प्रतिष्ठा


आजही सीतेने अग्निदिव्य करावे का?


‘यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमन्ते तत्र देवा:’ असे संस्कार करणाऱ्या या माझ्या संस्कृतीत खरेच स्त्रीयांचा सन्मान केला जातो का? हिंदु धर्मातील अनेक अनिष्ट प्रथा कालौघात नष्ट झाल्या. प्रत्येकवेळी निसर्गनियमा प्रमाणे स्वत: मध्ये बदल  करणाऱ्या या हिंदु धर्मात  सती सारख्या प्रथा केव्हाच हद्दपार झाल्या. मात्र खोट्या प्रतिष्ठेसाठी चिकटून असलेली हुंडा पध्दत  बदलण्याची मानसिकता अजूनही समाजामध्ये जोर धरत नाही. लातुर येथील शितल वायाळ या मुलीने हुंड्याला पैसा नाही म्हणून जीवनच संपविले. रामायणात सीतेला अग्निदिव्य करायला लावणाऱ्या या समाजाला आजही स्त्रीयांनी अग्निदिव्यच करायला हवे आहे काय?


नवनव्या बातम्यांनी रोजचा दिवस उजाडतो. काही बातम्या लक्षात राहतात तर काही आठवतही नाहीत. मात्र काही बातम्या या तुम्हाला अस्वस्थ करून सोडतात. पंधरा दिवसांपूर्वी लातूर तालुक्यातील भिसेवाघोली गावातील शीतल व्यंकट वायाळ या २१ वर्षीय मुलीने तिच्या लग्नासाठी वडीलांना कर्ज मिळत नसल्याने हुंडा कसा द्यायचा या विवंचनेतून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या बातमीने सारा महाराष्ट्रच हेलावला. या घटनेला आज पंधरा दिवस झाले. या पंधरा दिवसात अनेकांची लग्ने झाली. तेथील थाटमाट पाहून डोळे दिपत होते. समाजाचे मन मेल्याचेच हे लक्षण नव्हे काय? ज्या कारणासाठी शीतलने आत्महत्त्या केली तीच हुंडा पध्दत या ना त्या कारणाने आजही आपण स्विकारतो हे कशाचे द्योतक आहे?
      समाजातील खोटी प्रतिष्ठा, अनावश्यक स्पर्धा, आपापसातील चढाओढ या साऱयां मुळे लग्न हा एक संस्कार न राहता तो कुप्रथेकडेच जास्त झुकत चालल्याचे आज तरी दिसत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तर  मुलाच्या कमाईनुसार त्याचे हुंड्याचे दरपत्रक ठरलेले असते. साधा पदवीधर असलेला मुलगाही या लग्नाच्या बाजारात हुंड्याच्या रूपाने आपली लाखोंची बोली लावतो. त्याच्या लक्षात येत नाही की त्याला कळत नाही नकळत तो या बाजारात विकला जातो. हुंडा म्हणजे जिवंत माणसाची खरेदी विक्रीच नव्हे काय? या जिवघेण्या स्पर्धेचा ओघ श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत वहातच असतो. हुंडा ही एक परंपरा आहे आणि आपण ती पाळलीच पाहिजे असे निर्लज्ज समर्थनही यावेळी समाजातील काही महाभाग करतच असतात. जेवढा हुंडा जास्त तेवढी प्रतिष्ठा जास्त अशी एक स्वार्थी विचारसरणी समाजामध्ये जोर धरू पहात आहे. वास्तविक ही विचारसरणी नष्ट झाली पाहिजे परंतु जसा काळ बदलतो तशी ही विचारसरणी अधिकाधिक जोर धरू पहाते. ही विचारसरणी नसून एक प्रकारचा सामाजिक अविचारच आहे.
      हुंड्यापायी अमानुषपणे नववधुंची होत असलेली हत्या हा भारतीय संस्कृतीला लागलेला डाग आहे. हुंडा हा वरपक्षाची प्रतिष्ठा वाढविणारा मोजकाटाच आहे. पूर्वीच्या काळची स्त्रीधन ही कल्पना मधल्या काळात हुंडा प्रथेकडे कशी परावर्तीत झाली हे कळलेच नाही. आता मात्र ही प्रथा म्हणजे एक भयानक सामाजिक रोग झाला आहे. आज एकविसाव्या शतकातदेखील काही पुरूष हुंड्याच्या लालसेने आपल्या पत्नीला धगधगत्या ज्वालांमध्ये लोटून देतात, विष देऊन हत्या करतात किंवा तीला आत्महत्येस प्रवृत्त करतात. मुलीचा साधा जगण्याचा हक्कही सासरकडून हिरावला जातो. नादान किंवा
 नाकर्ते पुरूष आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी  किंवा आपले चोचले पुरविण्यासाठी वरदक्षिणा मागतात. यावेळी त्यांच्या मनात कोणताही अपराधीपणाचा भाव उमटत नाही. हीच मुले मात्र नंतर पुरूषीपणाचा अहंकार जोपासताना दिसतात.
शितल वायाळने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत विचारलेले प्रश्न केवळ एका समाजापुरतेच मर्यादीत नसून अखंड पुरूष जातीला विचार करायला लावणारे आहेत. शेवटी एकच,.कोणत्याही   समस्येवर आत्महत्या हा उपाय होवू शकत नाही. हुंडाविरोधी अनेक कायदे असूनही समाजात वारंवार अशा घटना घडतात याचे कारण कायद्यात पळवाटाही तितक्याच आहेत. या पळवाटा शोधण्यापेक्षा तरूणांनी आपली मानसिकता बदलणे हेच गरजेचे आहे. कायम अग्निदिव्य सीतेनेच का करावे?

                                                                                                                                        - शशांक सिनकर  

Tuesday, 18 April 2017

समुद्राला बदनाम का करता ?

                                    अतिउत्साह आणि मोहाला आवरा

                           समुद्राला बदनाम का करता ?


मालवण तालुक्यातील वायरी समुद्रकिनारी बेळगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा  चमू फिरावयास आला होता. तेथील समुद्राचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवाने आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर येथील समुद्र धोकादायक आहे, किनारा घाणेरडा आहे अश्या प्रतिक्रिया मृतांच्या नातेवाईकांनी दिल्याने जणू कोकणातील समुद्राच्या बदनामीच्या लाटा उसळल्या. मुलांच्यातील नको तेवढा अतिउत्साह आणि मोहाला आवर घालण्याऐवजी समुद्राला बदनाम कसले करता?


    कोकणाच्या निसर्ग सौंदर्यात मोलाची भर घालतो तो येथील सागरकिनारा. याच  सागराने भल्याभल्यांना वेड लावलं.अशा अथांग समुद्राच्या लाटेवर स्वार व्हायला कोणाला नाही आवडणार ? परंतु इथे येणाऱ्या  पर्यटकांना या पाण्याचा अंदाज येत नाही आणि मृत्यू होण्याच्या घटना घडतात. कोकणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडली नाही असा माणूस विरळाच.मग तो लेखक असो,कवी असो किंवा  एखादा चित्रपट निर्माता साऱ्यांनी  आपापल्या परीने कोकणचं निसर्ग सौंदर्य आपल्या कथा-कवितांमधून प्रतिबिंबित केलं.त्याचा परिणाम म्हणून कोकणकडे पर्यटकांचा ओढा वाढला.अगदी रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत समुद्रकिनारी पर्यटक नाहीत असा एकही दिवस नाही.परंतु या पर्यटकांच्या आकर्षणामुळे अनेकदा अपघात होऊन मनुष्यहानीही झाली आहे. नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुक्यातील वायरी येथे बेळगाव येथील मराठा  मंडळ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आणि येथे दु:खाच्याच लाटा उसळल्या. झालेली दुर्घटना निश्चितच सर्वांसाठी  दु:खदायक तसेच क्लेशकारक आहे. परंतु यामागील सत्य जाणून घेतल्यास या तरूण  विद्यार्थ्यांचा अतिउत्साह कारणीभूत आहे. महाविद्यालयीन जीवन हे खऱ्या  अर्थाने फुलपाखरासारखे असते. जीवन घडवण्याचा तो महत्वाचा कालखंड असतो. तुफानावर स्वार होण्याचे आणि अशक्य ते शक्य करण्याचे ते वय असते. पण या वयात संयम, सावधानता तसेच जबाबदारीचेही भान असणेही गरजेचे असते. नेमके याच ठीकाणी या विद्यार्थ्यांची गफलत झाली. मुळात हे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे, हल्लीच्या प्रथेनुसार आय.व्ही. म्हणजेच इंडस्टीयल व्हिजिटसाठी  ही सर्व मंडळी कोल्हापूरला निघाली होती. मात्र वाटेतच कोकणातील समुद्र किनारे पाहून त्यांना  पोहण्याचा मोह झाला. आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. यावर आता त्या दुर्दैवी मुलांचे कुटुंबिय नशिबासह येथील यंत्रणेला दोष देताहेत. वास्तविक येथील स्थानिक मच्छिमारांनी त्यांना समुद्र धोकादायक असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हे विद्यार्थी समुद्रात उतरले. हा दोष कोणाचा? यापूर्वीही अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर स्नानाचा आनंद घेणाऱ्या  पर्यटकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. काही महिन्यांपूर्वी गुहागर येथील समुद्र किनारी पोहण्याचा आनंद लुटणाऱ्या  मुंबईतील शेख आणि चांदा कुटुंबियातील सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या  अशा दुर्घटनांमुळे  किनारपट्टीवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उभा राहीला आहे.
     कोकणाला ७२० कि.मी.लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे.या किनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत.तर काही होऊ घातली आहेत.रायगड मधील अलिबाग, काशिद, किहीम, मुरूड, सासवणे, श्री हरिहरेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, मुरूड, कर्दे, लाडघर, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, मांडवी, भाट्ये, गणेशगुळे, गावखडी, कशेळी, जैतापूर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, विजयदुर्ग, मालवण, भोगवे, निवती, तारकर्ली येथील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.फेसाळणाऱ्या  लाटा आणि उधाणलेला समुद्र पर्यटकांना मोहून टाकतो. त्याच्याच आकर्षणाने पर्यटक समुद्राकडे आकर्षिले जातात मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आजपर्यंत कोकणातील या किनाऱ्यांवर शेकडो पर्यटकांचा बुडून मृत्यू  ओढवला आहे.
    समुद्रबळींची संख्या वाढू नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरक्षा अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे अभियान म्हणावे तितके प्रभावी राबवल्याचे दिसून येत नाही. कारण समुद्रकिना-यावर तसे मार्गदर्शंक फलक लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी समुद्रात उतरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत माहिती दिली आहे. मात्र अशा मार्गदर्शक फलकांची संख्या अजून जास्त असणे गरजेचे आहे. उसळणा-या लाटा मनसोक्त अंगावर घ्याव्यात असे येथे येणा-या पर्यटकाला वाटत असते परंतु पर्यटकांनीही लाटांशी खेळताना थोडी जागरूकता बाळगायला हवी, अन्यथा समुद्रात आंघोळ करायच्या मोहात त्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग थांबणार नाहीत. मौजमजा करण्याकरीता येणा-या पर्यटकांनी घरीसुध्दा आपली कोणीतरी वाट पहात आहे याचं भान बाळगयला हवं, नाहीतर मौजमजेच्या नादात आपले किमती आयुष्य उध्वस्त होईल.
                                                                                     

                                                                                      -शशांक सिनकर.

 

माध्यम क्षेत्रात काम करीत असताना समाजामध्ये घडणा-या ब-या- वाईट घटनांचा मनावर परिणाम होत राहतो. यावेळी निर्माण होणा-या भाव-भावनांच्या कल्लोळांचे प्रतिबिंब मनाच्या पटलावर उमटू लागते. केव्हा केव्हा विचारांची घुसमट होते. या घुसमटीला वाट मोकळी करण्यासाठीच हा ब्लॉग प्रपंच....