अतिउत्साह आणि मोहाला आवरा
समुद्राला बदनाम का करता ?
मालवण तालुक्यातील वायरी समुद्रकिनारी बेळगाव येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा चमू फिरावयास आला होता. तेथील समुद्राचा अंदाज न आल्यामुळे दुर्दैवाने आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर येथील समुद्र धोकादायक आहे, किनारा घाणेरडा आहे अश्या प्रतिक्रिया मृतांच्या नातेवाईकांनी दिल्याने जणू कोकणातील समुद्राच्या बदनामीच्या लाटा उसळल्या. मुलांच्यातील नको तेवढा अतिउत्साह आणि मोहाला आवर घालण्याऐवजी समुद्राला बदनाम कसले करता?
कोकणाच्या निसर्ग सौंदर्यात मोलाची भर घालतो तो येथील सागरकिनारा. याच सागराने भल्याभल्यांना वेड लावलं.अशा अथांग समुद्राच्या लाटेवर स्वार व्हायला कोणाला नाही आवडणार ? परंतु इथे येणाऱ्या पर्यटकांना या पाण्याचा अंदाज येत नाही आणि मृत्यू होण्याच्या घटना घडतात. कोकणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडली नाही असा माणूस विरळाच.मग तो लेखक असो,कवी असो किंवा एखादा चित्रपट निर्माता साऱ्यांनी आपापल्या परीने कोकणचं निसर्ग सौंदर्य आपल्या कथा-कवितांमधून प्रतिबिंबित केलं.त्याचा परिणाम म्हणून कोकणकडे पर्यटकांचा ओढा वाढला.अगदी रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत समुद्रकिनारी पर्यटक नाहीत असा एकही दिवस नाही.परंतु या पर्यटकांच्या आकर्षणामुळे अनेकदा अपघात होऊन मनुष्यहानीही झाली आहे. नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुक्यातील वायरी येथे बेळगाव येथील मराठा मंडळ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आणि येथे दु:खाच्याच लाटा उसळल्या. झालेली दुर्घटना निश्चितच सर्वांसाठी दु:खदायक तसेच क्लेशकारक आहे. परंतु यामागील सत्य जाणून घेतल्यास या तरूण विद्यार्थ्यांचा अतिउत्साह कारणीभूत आहे. महाविद्यालयीन जीवन हे खऱ्या अर्थाने फुलपाखरासारखे असते. जीवन घडवण्याचा तो महत्वाचा कालखंड असतो. तुफानावर स्वार होण्याचे आणि अशक्य ते शक्य करण्याचे ते वय असते. पण या वयात संयम, सावधानता तसेच जबाबदारीचेही भान असणेही गरजेचे असते. नेमके याच ठीकाणी या विद्यार्थ्यांची गफलत झाली. मुळात हे विद्यार्थी इंजिनिअरिंगचे, हल्लीच्या प्रथेनुसार आय.व्ही. म्हणजेच इंडस्टीयल व्हिजिटसाठी ही सर्व मंडळी कोल्हापूरला निघाली होती. मात्र वाटेतच कोकणातील समुद्र किनारे पाहून त्यांना पोहण्याचा मोह झाला. आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. यावर आता त्या दुर्दैवी मुलांचे कुटुंबिय नशिबासह येथील यंत्रणेला दोष देताहेत. वास्तविक येथील स्थानिक मच्छिमारांनी त्यांना समुद्र धोकादायक असल्याचे सांगितले होते. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून हे विद्यार्थी समुद्रात उतरले. हा दोष कोणाचा? यापूर्वीही अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर स्नानाचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे. काही महिन्यांपूर्वी गुहागर येथील समुद्र किनारी पोहण्याचा आनंद लुटणाऱ्या मुंबईतील शेख आणि चांदा कुटुंबियातील सात जणांचा बुडून मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे किनारपट्टीवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा उभा राहीला आहे.
कोकणाला ७२० कि.मी.लांबीचा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभला आहे.या किनाऱ्यावर अनेक पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत.तर काही होऊ घातली आहेत.रायगड मधील अलिबाग, काशिद, किहीम, मुरूड, सासवणे, श्री हरिहरेश्वर, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, मुरूड, कर्दे, लाडघर, गुहागर, वेळणेश्वर, गणपतीपुळे, मांडवी, भाट्ये, गणेशगुळे, गावखडी, कशेळी, जैतापूर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, विजयदुर्ग, मालवण, भोगवे, निवती, तारकर्ली येथील समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.फेसाळणाऱ्या लाटा आणि उधाणलेला समुद्र पर्यटकांना मोहून टाकतो. त्याच्याच आकर्षणाने पर्यटक समुद्राकडे आकर्षिले जातात मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आजपर्यंत कोकणातील या किनाऱ्यांवर शेकडो पर्यटकांचा बुडून मृत्यू ओढवला आहे.
समुद्रबळींची संख्या वाढू नये म्हणून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरक्षा अभियान राबविण्यास सुरूवात केली आहे. परंतु हे अभियान म्हणावे तितके प्रभावी राबवल्याचे दिसून येत नाही. कारण समुद्रकिना-यावर तसे मार्गदर्शंक फलक लावण्यात आले आहेत. पर्यटकांनी समुद्रात उतरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत माहिती दिली आहे. मात्र अशा मार्गदर्शक फलकांची संख्या अजून जास्त असणे गरजेचे आहे. उसळणा-या लाटा मनसोक्त अंगावर घ्याव्यात असे येथे येणा-या पर्यटकाला वाटत असते परंतु पर्यटकांनीही लाटांशी खेळताना थोडी जागरूकता बाळगायला हवी, अन्यथा समुद्रात आंघोळ करायच्या मोहात त्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग थांबणार नाहीत. मौजमजा करण्याकरीता येणा-या पर्यटकांनी घरीसुध्दा आपली कोणीतरी वाट पहात आहे याचं भान बाळगयला हवं, नाहीतर मौजमजेच्या नादात आपले किमती आयुष्य उध्वस्त होईल.
-शशांक सिनकर.
No comments:
Post a Comment