ध्येपथावरील दीप निमाला
‘‘ की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ’’ स्वातंत्र्यलढ्याप्रती स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे विचार पत्रकारितेतही ज्यांनी काटेकोरपणे जपले, असे दैनिक सागरचे संपादक ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब जोशी यांचे शनिवारी देहावसान झाले. एक सेवाव्रती, तपस्वी, निगर्वी मार्गदर्शक हरपल्याची तमाम कोकणवासियांची भावना झाली. आमच्या सारख्या शेकडो तरूण पत्रकारांना ज्यांनी नेकीचा मार्ग दाखवला, त्या ध्येयपथावरील दीपच आज निमाला...
शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास वार्तांकनासाठी एका कार्यक्रमाला निघालो असता पत्रकार मित्राचा फोन आला. अरे आपले नाना गेले. ‘‘नाना गेले’’ एवढेच शब्द कानात गेले. उवंरित संभाषण ऐकू आलेच नाही. खरंच नाना गेले?... चारच दिवसांपूर्वी ते आजारी असल्याचं कळलं होतं. मुंबईतील विश्व संवाद केंद्र या प्रतिष्ठित संस्थेच्या वतीने दरवषीं दिला जाणारा ‘महर्षी नारद पुरस्कार’ यावषीं दैनिक सागरचे सह संपादक श्री.भालचंद्र दिवाडकर सरांना नुकताच एका कार्यक्रमात देण्यात आला.त्यावेळी सागरचाही गौरव झाला. यावेळी दिवाडकर सरांजवळ बोलताना नानांची विचारपूस केली. सवं काही क्षेम असल्याचं त्यावेळी दिवाडकर सरांनी सांगितलं. या आमच्या संभाषणाला जेमतेम आठवडा उलटला असेल तोच नाना गेल्याची बातमी धडकली. क्षणभर विश्वास बसेना, पण कटू असलं तरी ते सत्य होतं. क्षणात मन इतिहासात गेलं. दहा वर्षांपूर्वी नानांच्या संपर्कात आलेला मी आज मुंबईत पत्रकारिता करू लागलो. त्यावेळी नानांनी आखून दिलेला मार्ग किती खडतर आहे हे जाणवतं. पत्रकारीता क्षेत्रात पदार्पण केले त्यावेळी नानांनी आम्हाला पत्रकारीतेची मूल्यं, पत्रकारीतेतील संकेत समजावून सांगितले. जे कायमच आम्हा तरूण पत्रकारांना कायमच मार्गदर्शक ठरत आले आहेत.
पन्नास वर्षांपूवीं चिपळूण सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून ‘सागर’ नावाचं दैनिक काढणं हीच मोठी अशक्यप्राय गेष्ट होती. परंतु नानांचा व्यासंग, सर्वच क्षेत्रातील त्यांचा संचार, विशेषत: देवी सरस्वतीचा असलेला त्यांच्यावर असलेला वरदहस्त, अपार कष्ट उपसण्याची तयारी अन् एका ध्येयाने प्रेरित होऊन केलेली वाटचाल यामुळे दैनिक सागर कोकण वासियांचं मुखपत्र बनलं.नानांचं कोकणावर असलेलं जीवापाड प्रेम,इथल्या युवकांनी सुशिक्षित होण्यासाठी केलेली धडपड, कोकणात उद्योगधंदे कसे वाढीस लागतील यासाठी सरकार दरबारी केलेला पाठपुरावा, कोकणच्या सर्वांंगिण विकासासाठी ‘‘ कोकण वैधानिक विकास महामंडळा’’साठी सततचा धरलेला आग्रह कोकणवासियांनी जवळून अनुभवला आहे. कोकणवर अफाट प्रेम असलं तरीही नाना कधीही प्रांतवादी नव्हते. कोकणात असलेलं टॅलेण्ट जगासमोर आलं पाहिजे एवढाच त्यांचा ध्यास होता.कोकणातील आम्हा तरूणांना म्हणूनच ते ‘दीपस्तंभ’ वाटतात. आज नानांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने निश्चितपणे कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील पत्रकारितेची हानी झाली आहे. पत्रकारिता हाच ज्यांचा श्वास अन् ध्यास होता अशा व्यासंगी पत्रकाराला आज महाराष्ट्र मुकला आहे.
- शशांक सिनकर
पत्रकार, दैनिक सामना, मुंबई

No comments:
Post a Comment