Thursday, 6 February 2020

भयभीत मने, अस्वस्थ समाज आणखी किती निर्भया होणार?

भयभीत मने, अस्वस्थ समाज

आणखी किती निर्भया होणार?


  काल वर्ध्यातील हिंगणघाट शहरात आणखी एक जळीतकांड झालं. भररस्त्यात, लोकांच्या डोळ्यादेखत उदयोन्मुख शिक्षिका कापरासारखी जळाली. दिल्लीतील निर्भया प्रकरणाला आठ वर्षे होऊनही आरोपींच्या गळ्यातील फास अजून हेलकावेच खातोय. कोपरडी बलात्कार प्रकरणाला चार वर्षे होत आली. शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब होत असल्याने आरोपीचे मनोबल वाढत आहे तर समाजाचा धीर सुटत आहे. अस्वस्थ समाजाला आणखी किती निर्भया पहायच्या असा सवाल पडला असून त्याला हैदराबादी निकाल हवाय.


समाजातील सज्जन शक्ती निद्रिस्त झाली की छोट्या छोट्या वाटणाऱ्या दुर्जन शक्ती मोठी समाजविघातक कामे करायला निर्ढावतात. त्यात आणखी अशा समाजविघातक शक्तींना शिक्षा करण्यात व्यवस्थेकडून विलंब झाला तर याच शक्तींचे मनोधैर्य वाढते. आणि त्याचे दुष्परिणाम साऱ्या समाजाला भोगावे लागतात. याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेंरी चौकात भर दिवसा एका नराधम तरुणाने अवघ्या बावीस वर्षीय तरुणीला रस्त्यातच पेट्रोल ओतून जाळले. ही युवती एका महाविद्यालयात तासिका तत्वावर शिक्षिका होती. त्या बिचारीचा दोष काय तर या तरुणाला तिने सपशेल नकार दिला. याचा सूड घेण्यासाठी या नराधमाने तिला आयुष्यातून उठवले. त्याचे काम झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण समाजासमोर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्या दुर्दैवी मुलीच्या आईने या नराधमालाही पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची मागणी केली आहे. काय चुकलं त्या माऊलीचे. तीने आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दारात उभं राहिलेलं पाहिलंय.पण कायद्याच्या चौकटीत ही मागणी मान्य होणार नाही. आता या प्रकरणाचा पोलीस तपास होईल, न्यायालयात खटला चालेल. आणि असेच चालू राहील. आपले कायदे चांगले आहेत पण अंमलबजावणीचे काय?
    दिनांक १६ डिसेंबर २०१२ रोजी ज्योती सिंग पांडे या दिल्लीतील भौतिकोपचार शिकणाऱ्या मुलीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तेरा दिवसांनी तिचा सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला. या बलात्काराचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले. दिल्लीसह संपूर्ण भारतभर अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पण आठ वर्षे झाली तरीही या आरोपीच्या गळ्याभोवती फास आवळला गेला नाही. या निर्भयाच्या दोषींना फाशी होईपर्यंत मी लढतच राहणार असल्याचा निर्धार तिच्या आईने केला आहे. यानंतर बरोबर चार वर्षांनी १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथे एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. कोपर्डी बलात्कार प्रकरण म्हणून या घटनेने महाराष्ट्राचे सामाजिक तसेच राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. आता या घटनेला चार वर्षे होत आली. या प्रकरणातील तीनही आरोपींना २९नोव्हेंबर २०१७ ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. अद्यापही या आरोपींचा फास तसाच लोंबकळत आहे.
  समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या या घटना आहेत. स्त्रीयांकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन, नको तितका पुरुषी अहंकार, कायद्याची वाटत नसलेली भीती आदी कारणांमुळे परत परत अशा घटना घडतच आहेत. न्यायाला विलंब लागत आहे, त्यामुळे समाजामध्ये नैराश्य येण्याची भीती आहे. या साऱ्या घटनांच्या शृंखलेमध्ये हैदराबाद मधील आरोपींचा पोलिसांनीच परस्पर न्याय केला. त्यामुळे देशभरातील विचारवंतांनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली. पण सामान्य माणसांना हाच खरोखर न्याय असल्याचे वाटते. हिंगणघाट प्रकरणातही सामान्य मनाचीही हीच अपेक्षा आहे.
     पण प्रत्येक वेळी असेच घडले तर समस्येवरील उपयाऐवजी उपायच अधिक होईल. गुन्हेगारांना वेळीच शिक्षा झाली नाही तर समाजच हाती शस्त्र घेईल. आणि आपल्यावरील अन्यायाचा निवडा स्वतःच करील. यावेळी तो न्याय नाही, तर अराजकाची नांदी असेल.

@ शशांक सिनकर

No comments:

Post a Comment