महिला "दीन" नाहीत;
नुसत्या शुभेच्छा कशाला?
आज सकाळपासून महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरु आहे. आता दुपार होत आली तरीही मी अजून पर्यंत कोणाला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. का नाही मी दिल्या शुभेच्छा? माझ्या मनात विचारांचं काहूर माजलय. आपण जिला महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो ती महिला खरोखरच अबला आहे का? नक्कीच नाही, आपण तिला ती अबला असल्याचं नकळत तिला कबूल करायला लावतोय. मग ती आई असो, पत्नी असो अगर बहीण असो अथवा मैत्रीण. आपण तिला गृहीत धरूनच चालतो. तिच्या मनाचा कधीच विचार करत नाही. मग कोणत्या अर्थाने तिला आज शुभेच्छा देऊ?
शुभेच्छा देण्यासाठी माझा हात मोबाईल जवळ जातो त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर निर्भया येते, हिंगणघाटची जळीता येते, लासलगावची पीडिता येते. इतकेच कशाला कुंटनखान्यातील वेश्या येते, एखाद्या झोपडीत दारुड्या पतीकडून मार खाणारी भगिनी येते. हे सारं चित्र डोळ्यासमोर येताच आपसूकच शुभेच्छा देण्यासाठी हातात घेतलेला मोबाईल गळून पडतो. मी अशा मतलबी शुभेच्छा कशाला देऊ?
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:" असं मानणाऱ्या माझ्या संस्कृतीत स्त्रीला आदिशक्ती मानलं गेलंय. ती शक्तीची देवता आहे. तिला मी अबला का म्हणू? सध्या दुर्दैवाने अन्नदात्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र या आत्महत्यांच्या संख्येत महिला कुठेच नाहीत. का ती महिला शेतकरी नाही? घरातील कर्ता अर्ध्यावर हा डाव मोडून गेला तरीही ती आपल्या लेकरांसाठी अतिकष्ट उपसून संसाराचा गाडा ओढत असते. अशी महिला अबला असूच कशी शकते? ओघाने विषय आलाच म्हणून सांगतो. आता महिलांवरील वाढत चाललेले अत्याचारांचे वर्णन करताना माध्यमामध्ये सुध्दा एक शब्दप्रयोग वापरला जातो तो म्हणजेे " पाशवी बलात्कार". आता हा पाशवी शब्द कशाला हवा? खरंतर इथे "पुरुषी अत्याचार" असाच शब्द हवा. कारण पाशवी शब्द ज्यावरून आला तो पशु देखील त्यांच्यातील मादीवर अत्याचार करत नाहीत. ती मादी असूनही त्या प्राण्यांच्या कळपात सुरक्षित असते. मात्र मानवामधील स्त्रीच इतकी असुरक्षित कशी? तर त्याचे कारण स्त्रीयांकडे बघण्याची वाईट दृष्टी. कोणतीही स्त्री असो ती उपभोगण्याचीच वस्तू आहे अश्या दृष्टीनेच तिच्याकडे पाहिले जाते. ही दृष्टीच ज्यावेळी बदलेल तेव्हाच येथील महिला सुरक्षित जीवन जगातील. अन्यथा निर्भयाच्या आईप्रमाणे अनेक पीडित महिला न्यायाच्या प्रतीक्षेत पिढ्यान पिढ्या कुढत राहतील. त्यांना एक दिवस शुभेच्छा देऊन त्यांचा पदोपदी अवमान का करायचा?
@ शशांक सिनकर


