संन्यासाकडून संसाराकडे व्हाया मोहमाया
मठाची उठाठेव का तरी?
भाजपा नेते योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेऊन राजशकट हाकायला प्रभावीपणे सुरूवात केल्यानंतर देशभरातील अनेक संन्याशी, स्वामी, योगींना पुन्हा सत्तास्थानी येण्याची स्वप्ने पडू लागली. धर्मकारणात राहून राजकारण न करता प्रत्यक्ष राजकरणात उतरुन समाजकार्य करण्याचे वेध त्यांना लागले. संसाराचा त्याग करून संन्यासीधर्म स्विकारलेल्या या मंडळींचा प्रवास ‘‘संन्यासाकडून संसाराकडे ’’ व्हाया मोहमाया असा उलटा सुरू आहे. मग यांनी मठाची उठाठेव तरी का करावी?
संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर शांत समाधानाने सर्वसंग परित्याग करून संन्यास घेणे असा आपल्या संस्कृतीमध्ये दंडक आहे. आपल्या जीवनाची ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास अशा चार आश्रमांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या काळात भौतिक सुखांमध्ये आपण एवढे गुरफटलो आहोत की, उतार वय झाले तरी वानप्रस्थाश्रमाची आपल्याला आठवण होत नाही. सुखाची कल्पनाच बदलल्यामुळे आपण कित्येकपटीने सुखी असूनही समोरच्याच्या सुखाशी स्पर्धा करताना आपण सतत दु:खी असल्याची भावना आपल्या मनाला सलत राहते. त्यामुळे भौतिक सुखांच्या जंजाळात माणूस एवढा पिचून जातो की, जीवनाच्या उतारवयात संन्यासाश्रम आहे याची जाणीवच उरत नाही. हे झाले सामान्य माणसांचे. पण ज्यांनी अशा संसारी सुखांचा त्याग करून संन्यास घेतला आहे, आता केवळ धर्मकारणच करायचे असा दृढनिश्चय करून आपापल्या मठांची स्थापना केली आहे अशा साधू, संन्यासी, योगींना पुन्हा राजकारणाचा पर्यायाने संसारात गुरफटण्याचा मोह होतो आहे हे उफराटे नाही काय?
भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेऊन राजकिय कारकीर्द पुन्हा सुरू केली. योगींच्या या राजकिय प्रगतीने प्रेरीत होऊन गुरूपुरा वज्रदेही मठाचे श्री राजशेखरनंद स्वामी, श्री गुरू बसवा महामनेचे श्री बसवानंद स्वामी तसेच श्री शिव शरण मदरा गुरू पीठाचे श्री मदरा चेन्नैया स्वामी यांनादेखील आपण राजकारणात यावे असे आता वाटू लागले आहे. त्यासाठी या साधू सज्जनांनी राजकिय पक्षांचे मार्ग धुंडाळण्यास आरंभ केला आहे. काहींना भाजप जवळचा वाटू लागला आहे तर काहींना काँग्रेसमध्ये आपले बस्तान बसेल असा विश्वास वाटू लागला आहे. त्यासाठी आपली तयारी असावी म्हणून काहींनी तर आपल्या धार्मिक भाषणांना धार कशी येईल याकडे लक्ष दिले आहे. तर काहींनी राजकारणात येण्यासाठी सामाजिक कार्यांना सुरूवात केली आहे.
राजस्थान, कर्नाटकसह चार राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या पार्श्व्भूमीवर समाजातील सर्वच स्तरावर लगबग सुरू झाली आहे. ही लगबग असायला कोणाचीच हरकत नाही. कारण निवडणूका येणं ही काही लोकांसाठी पर्वणी असते, तर काहींसाठी उदरनिर्वाहाचे साधन असते. आपण ते समजू शकतो. परंतु निवडणूकांच्या वातावरणाने धर्मकारणासारखे क्षेत्र प्रभावित होणे ही थोडी अचंबित करणारी गोष्ट आहे. हे सर्व यासाठीच सांगायचे की, निवडणूकांच्या वातावरणाने कर्नाटकातील सहा ते सात स्वामींनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पडद्यामागून राजकारणाची सुत्रे हलविण्यापेक्षा सक्रिय राजकारणात उतरून सामाजिक कार्यात झोकून देण्याचा निर्णय या स्वामी तसेच महाराजांनी घेतला आहे. विशेष म्हणजे राजकारणात येऊ पाहणारया या साधूंना आपल्याकडे खेचण्याचे काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यातील बहुतेक स्वामींना काँग्रेसऐवजी भाजपा हा चांगला पर्याय वाटत आहे. किमान चार स्वामींनी तरी आगामी निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यासोबत स्वामी आले नाहीत तर ते किमान भाजपसोबत जाऊ नयेत यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे.
गुजरात निवडणूकीपासून काँग्रेसनेही आपले ‘धर्मनिरपेक्षतेचे सोवळे’ खुंटीवर टांगत मंदिर आणि मठांच्या पायऱ्या झिजवायला सुरूवात केली आहे. निवडणूकांच्या पार्श्व्भूमीवर प्रसिद्धीमाध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चेनुसार कर्नाटकातील मठाधिपती राजकारणात येण्यासाठी अधिर झाले आहेत. स्वामी बसवानंद यांना भाजपच्या तिकिटावर कलाघाटगी मतदार संघातून निवडणूक लढवायची आहे, तर गोरक्षणाचे काम करणारे श्री राजशेखरनंद स्वामी यांनीही निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. श्री मदरा चेन्नेया स्वामी यांनी मात्र ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. भाजप कर्नाटकचे अध्यक्ष बी.एस.येडूरप्पा यांनी मात्र चेन्नेया स्वामींना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही त्यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी पायघड्या घालायला सुरूवात केली आहे. अशा मठाधिपतींचे कर्नाटकात मोठे प्रस्थ असते. किंबहुना आपला मतदारांवर जास्त प्रभाव पडू शकतो असे त्यांना वाटत असते.
शेवटी हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. कुणी काय करावे हे ज्याचे त्याने ठरवावे. तसा त्याला अधिकारही आहे. मात्र संसारातून मुक्ती घेऊन परमार्थाकडे धाव घेणाऱ्या सज्जनांनी पुन्हा आपला मार्ग बदलून या मोहमायेत गुरफटावे याला काय म्हणावे? परमार्थाकडे वाटचाल करताना प्रपंच हा त्या मार्गातील धोंडा आहे असा पूर्वी समज होता. समर्थ रामदास स्वामींनी श्री दासबोधामध्ये मानवी जीवनाचा आणि परमार्थाचा समन्वय साधला तसेच प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही असे ठामपणे सांगितले. श्री दासबोधाच्या सुरूवातीलाच समर्थांनी दासबोधाचा विषय ‘भक्तिमार्ग’ आहे असे सांगितले. दासबोध हा जीवनग्रंथ आहे. त्यात प्रपंचातून परमार्थाकडे कसे जावे याचे सुंदर वर्णन आहे. समर्थ म्हणतात ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका ।।’ संन्यासाकडून संसाराकडे व्हाया मोहमाया प्रवास करणाऱ्या या मंडळींनी दासबोधाचे हे सार अंगी बाणवायला हवे. अन्यथा मठाची उठाठेव करून काय उपयोग?
-शशांक सिनकर
No comments:
Post a Comment