Sunday 22 January 2023

भय इथले संपत नाही


 पहाटेची डुलकी की वेगाची नशा?

भय इथले संपत नाही

    मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे गुरुवारी पहाटे ट्रक आणि कार यांची धडक होऊन दहा माणसांचा जीव गेला तर त्याच वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत आराम बस उलटुन चौघांचा मृत्यू झाला. भल्या पहाटेच्या या घटनेने कोकणवासीयांची सकाळ काळवंडली. दोन चार कुटुंबे उध्वस्त झाली. पहाटेची ट्रकचालकला डुलकी आली की ट्रकचालकाला वेगाची नशा नडली? कारणे काहीही असोत पण अशा अपघातांमुळे या महामार्गावरील प्रवासाचे भय काही संपत नाही.




    गुरुवारची सकाळ उजाडलीच ती मुळी मुंबई गोवा महामार्गावरील अपघाताच्या बातमीने. रायगड जिल्ह्यातील माणगाव शहरालगत गोरेगाव रेपोली येथे ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात होऊन दहा जणांनी आपला जीव गमावला होता. दुर्देव असे की हे सर्व प्रवासी एकाच कुटुंबातील होते. याचवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराजवळील हळवल फाट्यानजीक आराम बस उलटून चार प्रवाश्यांचा  मृत्यू झाला. एकाचवेळी चौदा जणांच्या मृत्यूने अवघी कोकणपट्टी सुन्न झाली.  अपघात झाला, जे व्हायचे ते घडून गेले. पण यांच्या मृत्यूने अनेक प्रश्न मागे निर्माण झाले.         

   कोकणाचा पर्यटनातून विकास व्हावा, मुंबई गोवा हे अंतर कापताना वेळेची बचत व्हावी या उद्देशाने हा मार्ग चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाला. मात्र गेले कित्येक वर्षे हा मार्ग या ना त्या कारणाने रखडलेलाच आहे. याबाबत स्वतंत्र चर्चा होऊ शकते. पण या रखडलेल्या कामामुळेच अनेकदा भीषण अपघात झाले आहेत. आजही तिचा परिस्थिती कायम आहे. रस्त्याचे चालू असलेले सदोष काम, अधून मधून असलेले वळण रस्ते. दिशादर्शक फलकांची वानवा अश्या एक ना अनेक कारणांनी या महामार्गावर अनेकदा मोठे अपघात झाले आहेत. आजचा अपघातही असाच झाल्याचे पोलीस तपासात समोर येत आहे. 

पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतल्यानंतर समोर जी बाब आली ती गंभीर आहे. खेतरी नामक हा ट्रक चालक रात्री उशिरा लोटे एमआयडीसीतून बाहेर पडला तो मुंबईच्या दिशेने निघाला. पहाटेच्या सुमारास तो माणगावजवळ आला असता तो जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर चुकीच्या बाजूने चालला होता. त्याला रस्ता दुभाजकच दिसला नाही. हे सर्वात गंभीर आहे. काम सुरु असल्याच्या पाट्या न लावणे किंवा वळण रस्ता असल्याचा फलक न लावणे या चुकांसाठी महामार्ग प्राधिकरणाला जबाबदार धरायला नको का? गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्यापही संपलेले नाही. प्रवाशांना खाचखळगे, खड्डेमय रस्ते तसेच धुळीचा सामना करत प्रवास करावा लागतो. मुंबई नागपूर समृद्धी महामहामार्ग केवळ साडेचार वर्षांत पूर्ण होतो, मात्र बारा वर्षानंतरही या महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होईल हे सांगता येत नाही. कोकणवासीयांच्या दृष्टीने ही सर्वात मोठी शोकांतिका आहे.

    या महामार्गाची डिसेंबर २०१० साली घोषणा करण्यात आली. मोदी सरकारने २०१४ सालात महामार्गाच्या कामाला सुरुवात केली खरी परंतु प्रत्यक्षात काम सुरू झाले नव्हते. २०१८ मध्ये पहिली जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर संबंधित यंत्रणांना उत्तर देण्यास बांधील असल्याने खऱ्या अर्थाने महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र तब्बल बारा वर्षानंतरही हे काम पूर्ण झालेले नाही. समृद्धी महामार्ग निर्धारित वेळेपेक्षा कमी कालावधीत पूर्ण व्हावा म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वारंवार बैठक घेतल्या. मात्र कोकणातील या महामार्गाला कोणीच राजकीय वाली नसल्यासारखी अवस्था झाली आहे.

    सद्यस्थितीत या महामार्गाची कामातील प्रगती बघता पनवेल ते इंदापुरचे काम मे २०२१ पर्यंत ८८.८ टक्के पूर्ण झाले. उर्वरित काम करण्यासाठी कासू ते इंदापूर या टप्प्यासाठी करारनामा करण्यात आला आहे. पळस्पे ते कासू या टप्प्यासाठी नव्या कंत्राटदार कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्याला काम करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील वाकेड ते झाराप हा ११८ किलोमीटरचा महामार्ग एप्रिल २०२२ मध्ये तयार झाला आहे. सध्या या मार्गावरून वाहनांची वेगाने ये जा सुरू आहे. त्याचप्रमाणे कशेडी ते परशुराम घाट टप्प्याचे काम ९५ टक्के पुर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र अजूनही अनेक कामे अपूर्णच आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या अश्या या रडकथेमुळेही त्यावरील अपघातांची मालिका सुरूच राहते की काय असे भय कोकणवासीयांच्या मनात घर करून बसलेय.

 - शशांक सिनकर

Sunday 8 March 2020

महिला "दीन" नाहीत; 

नुसत्या शुभेच्छा कशाला?


  आज सकाळपासून महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरु आहे. आता दुपार होत आली तरीही मी अजून पर्यंत कोणाला शुभेच्छा दिलेल्या नाहीत. का नाही मी दिल्या शुभेच्छा? माझ्या मनात विचारांचं काहूर माजलय. आपण जिला महिला दिनानिमित्त शुभेच्छा देतो ती महिला खरोखरच अबला आहे का? नक्कीच नाही, आपण तिला ती अबला असल्याचं नकळत तिला कबूल करायला लावतोय. मग ती आई असो, पत्नी असो अगर बहीण असो अथवा मैत्रीण. आपण तिला गृहीत धरूनच चालतो. तिच्या मनाचा कधीच विचार करत नाही. मग कोणत्या अर्थाने तिला आज शुभेच्छा देऊ?
   शुभेच्छा देण्यासाठी माझा हात मोबाईल जवळ जातो त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर निर्भया येते, हिंगणघाटची जळीता येते, लासलगावची पीडिता येते. इतकेच कशाला कुंटनखान्यातील वेश्या येते, एखाद्या झोपडीत दारुड्या पतीकडून मार खाणारी भगिनी येते. हे सारं चित्र डोळ्यासमोर येताच आपसूकच शुभेच्छा देण्यासाठी हातात घेतलेला मोबाईल गळून पडतो. मी अशा मतलबी शुभेच्छा कशाला देऊ?
   “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:" असं मानणाऱ्या माझ्या संस्कृतीत स्त्रीला आदिशक्ती मानलं गेलंय. ती शक्तीची देवता आहे. तिला मी अबला का म्हणू? सध्या दुर्दैवाने अन्नदात्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र या आत्महत्यांच्या संख्येत महिला कुठेच नाहीत. का ती महिला शेतकरी नाही? घरातील कर्ता अर्ध्यावर हा डाव मोडून गेला तरीही ती आपल्या लेकरांसाठी अतिकष्ट उपसून संसाराचा गाडा ओढत असते. अशी महिला अबला असूच कशी शकते? ओघाने विषय आलाच म्हणून सांगतो. आता महिलांवरील वाढत चाललेले अत्याचारांचे वर्णन करताना माध्यमामध्ये सुध्दा एक शब्दप्रयोग वापरला जातो तो म्हणजेे " पाशवी बलात्कार". आता हा पाशवी शब्द कशाला हवा? खरंतर इथे "पुरुषी अत्याचार" असाच शब्द हवा. कारण पाशवी शब्द ज्यावरून आला तो पशु देखील त्यांच्यातील मादीवर अत्याचार करत नाहीत. ती मादी असूनही त्या प्राण्यांच्या कळपात सुरक्षित असते. मात्र मानवामधील स्त्रीच इतकी असुरक्षित कशी? तर त्याचे कारण स्त्रीयांकडे बघण्याची वाईट दृष्टी. कोणतीही स्त्री असो ती उपभोगण्याचीच वस्तू आहे अश्या दृष्टीनेच तिच्याकडे पाहिले जाते. ही दृष्टीच ज्यावेळी बदलेल तेव्हाच येथील महिला सुरक्षित जीवन जगातील. अन्यथा निर्भयाच्या आईप्रमाणे अनेक पीडित महिला न्यायाच्या प्रतीक्षेत पिढ्यान पिढ्या कुढत राहतील. त्यांना एक दिवस शुभेच्छा देऊन त्यांचा पदोपदी अवमान का करायचा?

@ शशांक सिनकर

Thursday 6 February 2020

भयभीत मने, अस्वस्थ समाज आणखी किती निर्भया होणार?

भयभीत मने, अस्वस्थ समाज

आणखी किती निर्भया होणार?


  काल वर्ध्यातील हिंगणघाट शहरात आणखी एक जळीतकांड झालं. भररस्त्यात, लोकांच्या डोळ्यादेखत उदयोन्मुख शिक्षिका कापरासारखी जळाली. दिल्लीतील निर्भया प्रकरणाला आठ वर्षे होऊनही आरोपींच्या गळ्यातील फास अजून हेलकावेच खातोय. कोपरडी बलात्कार प्रकरणाला चार वर्षे होत आली. शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब होत असल्याने आरोपीचे मनोबल वाढत आहे तर समाजाचा धीर सुटत आहे. अस्वस्थ समाजाला आणखी किती निर्भया पहायच्या असा सवाल पडला असून त्याला हैदराबादी निकाल हवाय.


समाजातील सज्जन शक्ती निद्रिस्त झाली की छोट्या छोट्या वाटणाऱ्या दुर्जन शक्ती मोठी समाजविघातक कामे करायला निर्ढावतात. त्यात आणखी अशा समाजविघातक शक्तींना शिक्षा करण्यात व्यवस्थेकडून विलंब झाला तर याच शक्तींचे मनोधैर्य वाढते. आणि त्याचे दुष्परिणाम साऱ्या समाजाला भोगावे लागतात. याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेत आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील नंदेंरी चौकात भर दिवसा एका नराधम तरुणाने अवघ्या बावीस वर्षीय तरुणीला रस्त्यातच पेट्रोल ओतून जाळले. ही युवती एका महाविद्यालयात तासिका तत्वावर शिक्षिका होती. त्या बिचारीचा दोष काय तर या तरुणाला तिने सपशेल नकार दिला. याचा सूड घेण्यासाठी या नराधमाने तिला आयुष्यातून उठवले. त्याचे काम झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण समाजासमोर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्या दुर्दैवी मुलीच्या आईने या नराधमालाही पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची मागणी केली आहे. काय चुकलं त्या माऊलीचे. तीने आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दारात उभं राहिलेलं पाहिलंय.पण कायद्याच्या चौकटीत ही मागणी मान्य होणार नाही. आता या प्रकरणाचा पोलीस तपास होईल, न्यायालयात खटला चालेल. आणि असेच चालू राहील. आपले कायदे चांगले आहेत पण अंमलबजावणीचे काय?
    दिनांक १६ डिसेंबर २०१२ रोजी ज्योती सिंग पांडे या दिल्लीतील भौतिकोपचार शिकणाऱ्या मुलीवर सहा जणांनी चालत्या बसमध्ये हल्ला करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तेरा दिवसांनी तिचा सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाला. या बलात्काराचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पडसाद उमटले. दिल्लीसह संपूर्ण भारतभर अनेक मोर्चे काढण्यात आले. त्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. पण आठ वर्षे झाली तरीही या आरोपीच्या गळ्याभोवती फास आवळला गेला नाही. या निर्भयाच्या दोषींना फाशी होईपर्यंत मी लढतच राहणार असल्याचा निर्धार तिच्या आईने केला आहे. यानंतर बरोबर चार वर्षांनी १३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथे एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. कोपर्डी बलात्कार प्रकरण म्हणून या घटनेने महाराष्ट्राचे सामाजिक तसेच राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. आता या घटनेला चार वर्षे होत आली. या प्रकरणातील तीनही आरोपींना २९नोव्हेंबर २०१७ ला अहमदनगरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. अद्यापही या आरोपींचा फास तसाच लोंबकळत आहे.
  समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या या घटना आहेत. स्त्रीयांकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन, नको तितका पुरुषी अहंकार, कायद्याची वाटत नसलेली भीती आदी कारणांमुळे परत परत अशा घटना घडतच आहेत. न्यायाला विलंब लागत आहे, त्यामुळे समाजामध्ये नैराश्य येण्याची भीती आहे. या साऱ्या घटनांच्या शृंखलेमध्ये हैदराबाद मधील आरोपींचा पोलिसांनीच परस्पर न्याय केला. त्यामुळे देशभरातील विचारवंतांनी पोलिसांवर टीकेची झोड उठवली. पण सामान्य माणसांना हाच खरोखर न्याय असल्याचे वाटते. हिंगणघाट प्रकरणातही सामान्य मनाचीही हीच अपेक्षा आहे.
     पण प्रत्येक वेळी असेच घडले तर समस्येवरील उपयाऐवजी उपायच अधिक होईल. गुन्हेगारांना वेळीच शिक्षा झाली नाही तर समाजच हाती शस्त्र घेईल. आणि आपल्यावरील अन्यायाचा निवडा स्वतःच करील. यावेळी तो न्याय नाही, तर अराजकाची नांदी असेल.

@ शशांक सिनकर

Wednesday 22 August 2018

चिमण्या परत फिरतील का?

चिमण्या परत फिरतील का?

काही घटना , काही गोष्टी अगदी मनाला जाऊन भिडतात. काही गीते तर हमखास हृदयाला हेलावून टाकतात. याचाच प्रत्यय मला काल आला. ऑफिसमध्ये कामातून थोडी उसंत मिळाली असता मोबाईलवर सहज म्हणून आठवणीतील गाणी ऐकत होतो. त्यावेळी 'जिव्हाळा' चित्रपटातील गीतकार महाकवी ग.दि. माडगूळकर यांनी शब्दबद्ध केलेलं आणि गानसम्राज्ञी लतादीदींनी गायलेलं ' या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या...' हे गीत ऐकलं. या गीतात गदिमा नी लिहिलेले शब्द आपल्या हृदयाचा ठाव घेतल्यावाचून रहात नाहीत. आपल्या लेकरांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या व्याकूळ आईचे हृदयस्पर्शी शब्द गदिमांनी लिहिले आहेत. या गीताच्या शेवटच्या ओळी ' या बाळांनो या रे लवकर, वाटा अंधारल्या' या ओळी मनातल्या मनात पुन्हा पुन्हा गुणगुणत टेबलावर आलेल्या बातम्या करू लागलो. मन भूतकाळात केव्हाच गेलं होतं. संध्याकाळी उशीर झाला म्हणून घरी धावत सुटलो असताना दारात उभी असलेली वाट पाहणारी आई दिसली, आणि पुन्हा पुन्हा "वाट अंधारल्या" या ओळी डोक्यात घोळू लागल्या.  या विचारात असतानाच लातूर जिल्ह्यातील एक बातमी नजरेसमोर आली. बातमी तशी हल्लीच्या रुटीनचीच होती. परंतु खरोखरच "वाटा अंधारल्या"ची जाणीव करून देणारी होती.
    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धश्रमात चार वर्षांपूर्वी रहायला आलेल्या डॉ. अरुण गोधमगावकरांचे 18 ऑगस्ट रोजी निधन झाले. आता यात नवीन काय, असे आपणास वाटेल. डॉ. गोधमगावकर यांना मी व्यक्तिशः ओळखत नाही, की त्यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही. परंतु त्यांच्या निधनावेळची स्थिती वाचून मी अस्वस्थ झालो. ज्या चिमण्यांच्या पंखात या डॉक्टर दाम्पत्याने आशेचे बळ भरले होते ती पाखरे आज त्यांच्या घरट्यातून तर निघाली होतीच, परंतु आयुष्याच्या सांजवेळी आर्त हाका मारूनही ती घराकडे परतायला तयार नव्हती. शेवटी संस्था चालकांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडत डॉक्टरांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. नायगाव तालुक्यातील गोधमगावचे रहिवासी असलेले डॉक्टर एक नामांकित बालरोगतज्ज्ञ होते. अत्यंत कठीण दिवस काढून त्यांनी शिक्षण घेतले होते. आपल्या वाटेल आलेल्या हाल अपेष्टा आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांनी स्वतः कष्ट उपसत मुलाला एम. डी. केले. तसेच मुलीला स्त्री रोगतज्ज्ञ केले. त्यानंतर त्यांनी सून आणि जावई ही डॉक्टरच बघून मुलामुलींचे लग्न लावून दिले. लग्नानंतर मुलगा आणि मुलगी दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले. डॉक्टर पती पत्नीला फार आनंद झाला. हळूहळू कुटुंब वाढू लागले. डॉक्टरांना नातवंड झाली,जो तो आपापल्या संसारात रमला. आता मात्र मुलामुलीला  आईवडिलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता. अशाच एके दिवशी डॉक्टरांच्या पत्नीचे निधन झाले, हे समजूनही मुलगा मुलगी आईच्या अंत्यसंस्काराला आली नाहीत. डॉक्टरांना खूप वाईट वाटले.
  त्यानंतर डॉक्टरांनी सगरोली येथील सैनिक स्कुल मधील रुग्णालयामध्ये काही काळ सेवा केली. मात्र वयानुसार काम झेपेनासे झाल्यावर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुक्मिणी वृद्धश्रमात आपला मुक्काम हलवला. तेथे चार वर्षे राहिल्यानंतर अखेर वृद्धापकाळाने त्यांचे 18 ऑगस्टला निधन झाले. नियमाप्रमाणे वृद्धश्रमाच्या संचालकांनी अमेरिकेतील मुलांना कळवले. मात्र आम्हाला सध्या यायला मिल नार नाही असे सांगून तुम्हीच अंत्यविधी आटोपून घ्या, असा निरोप दिला. डॉक्टर गेले, त्यांनी केलेली रुग्णसेवा तेवढी मागे राहिली.
    डॉक्टरांचा मृत्यू सर्वसामान्यांसारखाच होता. परंतु त्याने अनेक प्रश्नांना जन्म दिला होता. डॉक्टरांच्या मृत्यूने नव्हे, तर त्यांच्या मुलांच्या अशा वर्तनाने मी अस्वस्थ झालो. का वागली असतील ती मुले अशी? खरंच आई वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी ही त्यांच्याकडे वेळ नसेल का? पैसा मिळवण्यासाठी माणूस इतका प्रॅक्टिकल होतो? काय कमी केले असेल त्या आई वडिलांनी? आपण मुलांच्या पंखात बळ दिलं ते भरारी घेण्यासाठीच ना? मग याच पंखाच्या आधारे आकाशात उंच उंच जाताना या पिलांना घरट्या चा विसर का बरे पडला? असा प्रश्न त्या आईवडिलांच्या आत्म्याला पडला असेलच ना? मुलांनी आपल्या वृद्ध आलं वडिलांना का त्यागावं? त्यांच्या उतार वयात त्यांची काठी बनून रहावं हे त्याचं कर्तव्य नाही का? की सर्व जबाबदारी समाजावर सोपवून मोकळं व्हायचं? अशा अनेकविध प्रश्नांचं ओझं डोक्यावर घेऊनच ऑफिसच्या पायऱ्या उतरू लागलो.

- शशांक सिनकर

Monday 5 February 2018

मठाची उठाठेव का तरी?

                                     संन्यासाकडून संसाराकडे व्हाया मोहमाया
        

                                   मठाची उठाठेव का तरी? 

 भाजपा नेते योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेऊन राजशकट हाकायला प्रभावीपणे सुरूवात केल्यानंतर देशभरातील अनेक संन्याशी, स्वामी, योगींना पुन्हा सत्तास्थानी येण्याची स्वप्ने पडू लागली. धर्मकारणात राहून राजकारण न करता प्रत्यक्ष राजकरणात उतरुन समाजकार्य करण्याचे वेध त्यांना लागले. संसाराचा त्याग करून संन्यासीधर्म स्विकारलेल्या या मंडळींचा प्रवास ‘‘संन्यासाकडून संसाराकडे ’’ व्हाया मोहमाया असा उलटा सुरू आहे. मग यांनी मठाची उठाठेव तरी का करावी? 


संसाराच्या सर्व जबाबदाऱ्या  पार पाडल्यानंतर शांत समाधानाने सर्वसंग परित्याग करून संन्यास घेणे असा आपल्या संस्कृतीमध्ये दंडक आहे. आपल्या जीवनाची  ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास अशा चार आश्रमांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. मात्र सध्याच्या काळात भौतिक सुखांमध्ये आपण एवढे गुरफटलो आहोत की, उतार वय झाले तरी वानप्रस्थाश्रमाची आपल्याला आठवण होत नाही. सुखाची कल्पनाच बदलल्यामुळे आपण कित्येकपटीने सुखी असूनही समोरच्याच्या सुखाशी स्पर्धा करताना आपण सतत दु:खी असल्याची भावना आपल्या मनाला सलत राहते. त्यामुळे भौतिक सुखांच्या जंजाळात माणूस एवढा पिचून जातो की, जीवनाच्या उतारवयात संन्यासाश्रम आहे याची जाणीवच उरत नाही. हे झाले सामान्य माणसांचे. पण ज्यांनी अशा संसारी सुखांचा त्याग करून संन्यास घेतला आहे, आता केवळ धर्मकारणच करायचे असा दृढनिश्चय करून आपापल्या मठांची स्थापना केली आहे अशा साधू, संन्यासी, योगींना पुन्हा राजकारणाचा पर्यायाने संसारात गुरफटण्याचा मोह होतो आहे हे उफराटे नाही काय?
भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेऊन राजकिय कारकीर्द पुन्हा सुरू केली. योगींच्या या राजकिय प्रगतीने प्रेरीत होऊन गुरूपुरा वज्रदेही मठाचे श्री राजशेखरनंद स्वामी, श्री गुरू बसवा महामनेचे श्री बसवानंद स्वामी तसेच श्री शिव शरण मदरा गुरू पीठाचे श्री मदरा चेन्नैया स्वामी यांनादेखील आपण राजकारणात यावे असे आता वाटू लागले आहे. त्यासाठी या साधू सज्जनांनी राजकिय पक्षांचे मार्ग धुंडाळण्यास आरंभ केला आहे. काहींना भाजप जवळचा वाटू लागला आहे तर काहींना काँग्रेसमध्ये आपले बस्तान बसेल असा विश्वास वाटू लागला आहे. त्यासाठी आपली तयारी असावी म्हणून काहींनी तर आपल्या धार्मिक भाषणांना धार कशी येईल याकडे लक्ष दिले आहे. तर काहींनी राजकारणात येण्यासाठी सामाजिक कार्यांना सुरूवात केली आहे.
राजस्थान, कर्नाटकसह चार राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या पार्श्व्भूमीवर समाजातील सर्वच स्तरावर लगबग सुरू झाली आहे. ही लगबग असायला कोणाचीच हरकत नाही. कारण निवडणूका येणं ही काही लोकांसाठी पर्वणी असते, तर काहींसाठी उदरनिर्वाहाचे साधन असते. आपण ते समजू शकतो. परंतु निवडणूकांच्या वातावरणाने धर्मकारणासारखे क्षेत्र प्रभावित होणे ही थोडी अचंबित करणारी गोष्ट आहे. हे सर्व यासाठीच सांगायचे की, निवडणूकांच्या वातावरणाने कर्नाटकातील सहा ते सात स्वामींनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणेच राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पडद्यामागून राजकारणाची सुत्रे हलविण्यापेक्षा सक्रिय राजकारणात उतरून सामाजिक कार्यात झोकून  देण्याचा निर्णय या स्वामी तसेच महाराजांनी घेतला आहे. विशेष म्हणजे राजकारणात येऊ पाहणारया  या साधूंना आपल्याकडे खेचण्याचे काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र यातील बहुतेक स्वामींना काँग्रेसऐवजी भाजपा हा चांगला पर्याय वाटत आहे. किमान चार स्वामींनी तरी आगामी निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्यासोबत स्वामी आले नाहीत तर ते किमान भाजपसोबत जाऊ नयेत यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावायला सुरूवात केली आहे. 
गुजरात निवडणूकीपासून काँग्रेसनेही आपले ‘धर्मनिरपेक्षतेचे सोवळे’ खुंटीवर टांगत मंदिर आणि मठांच्या पायऱ्या  झिजवायला सुरूवात केली आहे. निवडणूकांच्या पार्श्व्भूमीवर प्रसिद्धीमाध्यमांमध्ये होत असलेल्या चर्चेनुसार कर्नाटकातील मठाधिपती राजकारणात येण्यासाठी अधिर झाले आहेत. स्वामी बसवानंद यांना भाजपच्या तिकिटावर कलाघाटगी मतदार संघातून निवडणूक लढवायची आहे, तर गोरक्षणाचे काम करणारे श्री राजशेखरनंद स्वामी यांनीही निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. श्री मदरा चेन्नेया स्वामी यांनी मात्र ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. भाजप कर्नाटकचे अध्यक्ष बी.एस.येडूरप्पा यांनी मात्र चेन्नेया स्वामींना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही त्यांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी पायघड्या घालायला सुरूवात केली आहे. अशा मठाधिपतींचे कर्नाटकात मोठे प्रस्थ असते. किंबहुना आपला मतदारांवर जास्त प्रभाव पडू शकतो असे त्यांना वाटत असते. 
शेवटी हा ज्याच्या त्याच्या विवेकबुद्धीचा प्रश्न आहे. कुणी काय करावे हे ज्याचे त्याने ठरवावे. तसा त्याला अधिकारही आहे. मात्र संसारातून मुक्ती घेऊन परमार्थाकडे धाव घेणाऱ्या  सज्जनांनी पुन्हा आपला मार्ग बदलून या मोहमायेत गुरफटावे याला काय म्हणावे? परमार्थाकडे वाटचाल करताना प्रपंच हा त्या मार्गातील धोंडा आहे असा पूर्वी समज होता. समर्थ रामदास स्वामींनी श्री दासबोधामध्ये मानवी जीवनाचा आणि परमार्थाचा समन्वय साधला तसेच प्रपंच परमार्थाच्या आड येत नाही असे ठामपणे सांगितले. श्री दासबोधाच्या सुरूवातीलाच समर्थांनी दासबोधाचा विषय ‘भक्तिमार्ग’ आहे असे सांगितले. दासबोध हा जीवनग्रंथ आहे. त्यात प्रपंचातून परमार्थाकडे कसे जावे याचे सुंदर वर्णन आहे. समर्थ म्हणतात ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावे परमार्थ विवेका ।।’ संन्यासाकडून संसाराकडे व्हाया मोहमाया प्रवास करणाऱ्या  या मंडळींनी दासबोधाचे हे सार अंगी बाणवायला हवे. अन्यथा मठाची उठाठेव करून काय उपयोग? 
                                                                                                                                  -शशांक सिनकर

Sunday 10 September 2017

पुरोगाम्यांचा एकांगी विलाप

सावधान, रात्र वैऱ्याची आहे...

पुरोगाम्यांचा एकांगी विलाप


 महाराष्ट्रासह देशभरातील पुरोगामी सध्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल प्रचंड विलाप करीत आहेत. त्या विलापामागे दु:ख कमी आणि सूडाचीच भावना जास्त असा सारा प्रकार आहे. कारण यामागे सूडभावना नसती तर लागलीच त्यांनी हिंदुत्ववाद्यांना टीकेचे लक्ष्य केले नसते. पण तो त्यांचा जन्मजात गुण आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनीच आता अधिक सजग रहायला हवे. रात्र वैऱ्याची आहे. गौरी लंकेश यांच्या निधनाबद्दल पुरोगाम्यांचा एकांगी विलाप चालू आहे. 



   कर्नाटकातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लंकेश पत्रिका ’ या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची नुकतीच हत्या झाली. त्यादिवशी अनंत चतुर्दशी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये गणेश विसर्जनाची गडबड सुरू होती. त्यामुळे तसे पाहिले तर महाराष्ट्रात का होईना ही बातमी जरा उशीराच कळली. तोपर्यंत स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गळे काढण्यास सुरूवातही केली होती. एखाद्या व्यक्तीची हत्या होणे हे दुर्दैवीच आहे. परंतु त्या मेलेल्या माणसाचे निमित्त करून तिच्या चितेवर आपली पोळी भाजून घेणे हेही तितकेच समाजद्रोही आहे. नेमके हेच काम गौरी यांच्या हत्येनंतरही चालूच आहे. ज्याप्रमाणे गिधाडे एखाद्या जनावराच्या मरणाची वाट पहात असतात तद्वत ही पुरोगामी मंडळी एखाद्या विचारवंताची हत्या होते कधी आणि आम्ही हिंदुत्ववाद्यांना जबाबदार धरतो कधी याचीच वाट पहात असतात. गौरी यांच्या बाबतीतही हेच घडून येत आहे. ही हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली आहे असा बिनबुडाचा आरोप करण्यास या मंडळींनी सुरूवातही केली आहे. 
   कोणत्याही हत्येचं समर्थन होऊच शकत नाही. कोणतीही हत्या ही हत्याच असते. मग ती पुरोगाम्यांची असो अगर प्रतिगाम्यांची. हत्येने माणूस संपतो, विचार नाही. मुद्दा असा की, गौरी यांच्या हत्येनंतर समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यामध्ये पुरोगाम्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केल्याचे दिसताच हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या  अनेक पोस्ट या माध्यमांवर फिरल्या. या प्रतिक्रिया निश्चितच हिंदुत्ववाद्यांना अभिमानास्पद वाटत असतीलही. परंतु याचेच भांडवल करीत ही पुरोगामी मंडळी गावभर नाचत सुटली आहेत. त्यांना गौरी यांच्या हत्येबद्दल काहीही सोयरसुतक नाहीये. केवळ गौरी यांच्या हत्येचे निमित्त करून हिंदुत्ववादी विचारांना झोडपायचे आहे. त्यांचे हे स्वप्न सोशल मिडीयावरचे हिंदुत्ववादी विचारवंत आपल्या प्रतिक्रियांतून आयतेच पूर्ण करीत आहेत. त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदुत्ववाद्यांनो सावधान रात्र  वैऱ्याची आहे. 
स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे गौरी यांच्या हत्येवर हसत असतील तर तीही विकृतीच नाही काय? म्हणजे पुरोगाम्यांनी गाय मारली म्हणून हिंदुत्ववाद्यांनी वासरू मारण्यासारखे नव्हे काय? असे असेल तर या विकृतीला हिंदुत्ववाद्यांचे आवरण लावू नका कारण तुम्हाला हिंदु या शब्दाची व्याख्याच कळली नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आपल्या या अशा कृतीमुळे सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जाते. मग तो मालेगावचा बॉम्बस्फोट असो,किंवा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या असोत.या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम केलेच ना? हेच तंत्र पुरोगामी तुमच्या या अशा कृतीतून गौरी हत्या प्रकरणात वापरत आहेत.  अशा विकृत आनंदाच्या पोस्ट टाकून त्यांच्या हाती आयते कोलीत का द्यायचे? 
   
मुळात एक लक्षात घेतले पाहिजे की, लोकशाहीची हत्या झाली म्हणून उर बडवणाऱ्या  या पुरोगाम्यांना दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्याबरोबरच गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास लागणे नकोच आहे. केवळ साप साप म्हणून भुई धोपटण्यातच त्यांना स्वारस्य आहे. त्यामुळेच देशभरात कुठेही हिंदुत्ववादी सोडून अन्य कोणत्याही विचारसरणीच्या व्यक्तीची हत्या झाल्यास  विचारांवर हल्ला झाला अशी ते बोंब ठोकतात. हिंदुत्ववादी हा त्यांच्या लेखी विचार नसतोच. त्याचमुळे केरळमध्ये संघस्वयंसेवकांच्या हत्या होऊनही साधा निषेधाचा एक सूरही उमटला नाही. यासाठीच हिंदुत्ववाद्यांनीही हिंदुसंघटना बदनाम होतील असे कोणतेही कृत्य करू नये. याउलट गौरी यांचा खूनी लवकरात लवकर पकडला जावा यासाठी आवाज उठवावा. जेणेकरून तपासही योग्य दिशेने होईल आणि बिनबुडाचे आरोप करणाऱ्या  पुरोगाम्यांचा आवाजही बसेल. अन्यथा पुरोगाम्यांचा एकांगी विलाप सुरूच राहील.

                                                                                – शशांक सिनकर


Thursday 13 July 2017

अतिउत्साही आचरटपणा

फेसबुक ‘लाईव्ह’, आयुष्य ‘डेड’


    अतिउत्साही आचरटपणा 

   
   प्रीती भिसे नामक एका सतरा वर्षीय युवतीचा मरीन ड्राइव्ह येथे सेल्फी काढताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. आणि त्यानंतर सेल्फी काढताना दुर्घटना घडल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. ही श्रृंखला कुठेतरी तुटावी अशी अपेक्षा असतानाच नागपूरातील वेण्णा सरोवरात आठजण बुडाल्याची बातमी धडकली. विशेष म्हणजे हे सर्वजण सेल्फीच काढत होते. फेसबुक ‘लाईव्ह’ करताना आयुष्यच ‘डेड’ झाले त्याचं काय? असला आचरटपणा करताना सर्वांची कुटुंबे उघड्यावर पडली.  तरूणांचं हे ‘सेल्फी’वेड समाजाला घातक तर ठरत नाहीये ना?...
   

 स्वामी विवेकानंदांनी असे म्हटले होते की, मला देशप्रेमाने भारलेले असे केवळ शंभर तरूण द्या, मी हा देश बदलून दाखवेन. सध्याच्या पंतप्रधानांचाही भरवसा युवा पिढीवर जरा जास्तच आहे. देशातील युवकांची संख्या जास्त आहे म्हणून हा देश तरूण असे समीकरण मांडले जात आहे. हे जरी कितीही खरे असले तरीही युवकांना याबाबत काय वाटते हाच खरा मुद्दा आहे. तरुणांची स्वप्ने, त्यांचे आदर्श, त्यांचे विचार हे सर्वच काही एका भक्कम मजबूत अशा साखळदंडाने बांधले आहेत की काय अशी सध्या परिस्थिती आहे. ‘मोबाईल’ नावाचा हाच तो साखळदंड आहे. या मोबाईलमुळे जग जवळ आले असे म्हणतात. परंतु माणसे दुरावत चालली. आजचे युवक एकमेकांशी बोलत नाहीत ते आपला संदेश मोबाईलवर पाठवतात. त्यांच्यात स्पर्धा आहे परंतु ती निकोप नाही. त्यांच्यात असते ती फक्त चढाओढ. मी सर्वांत पुढे असावे अशी प्रत्येक तरुणाचीच धारणा असते. ती काही चुकीची नाही. परंतु केवळ पुढे असून काय उपयोग? त्याने काही जीवनात फरक पडणार आहे का? अशी स्पर्धा जर एखाद्याचा जीव घेणार असेल तर अशी स्पर्धा हवीच कशाला?
    सध्या तरुणाईच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. पूर्वी शिक्षणाच्या संधी फार नसल्यामुळे विद्यार्थी आपल्या घरीच राहून जवळपासच्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असे. त्याचा फायदा असा होत असे की, त्यांच्या आईवडिलांना, पालकांना आपल्या पाल्यावर लक्ष ठेवता येत असे. परंतु आता शिक्षणाची दारे सताड उघडली.  जगाची क्षितिजे या नवतरुणांना खुणावू लागली. त्यामुळे आपोआपच शिक्षणानिमित्त घराबाहेर राहणे आले. त्यामुळे निरनिराळ्या प्रांतातील विद्यार्थी एकत्र राहू लागल्याने प्रत्येकाची संस्कृती, परंपरा जोपासण्याचा कल वाढू लागला. हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की, या सर्व वातावरणातून मग आठवड्यातून ‘पिकनिक’ची संकल्पना पुढे आली. पूर्वी सहली निघायच्या त्यामध्ये काहीतरी शिकण्याचा, नवीन पाहण्याचा उद्देश असे.परंतु या ‘पिकनिक’ मधून नवीन काही नाही. ना नवे शोध, ना नवे शिक्षण! केवळ आठवडाभर शिक्षण घेतल्यामुळे किंवा काम केल्यामुळे आलेला थकवा दूर करावा एवढाच त्यामागचा उद्देश. हल्ली तरुण म्हणजे ‘उत्साह’ आणि तरुणाई म्हणजे ‘दांडगाई’ एवढेच अर्थ अभिप्रेत आहेत. कामाचा शीण आला म्हणून ‘पिकनिक’ आणि ‘पिकनिक’ आहे म्हणून उत्साह असे समीकरण सध्या चालू आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की, तरुणांच्या मजेच्या व्याख्या बदलल्यामुळे आपण करू तीच मजा असे त्यांना वाटू लागले आहे. मग आपली मजा इतरांना सांगण्यासाठी अतितत्पर मेसेज सेवा आहेच. आतातर तंत्रज्ञान एवढे पुढारले आहे की, तुम्ही केलेला व्हिडीओ सुद्धा तुम्ही सातासमुद्रापार असलेल्या आपल्या मित्रांना शेअर करू शकता. मग काय तरूणाई लागली कामाला. आपण पिकनिकसाठी कुठे गेलो, काय केलं, काय खाल्ले हे सर्व शुटींग करून व्हॉटसअप किंवा फेसबुकवर ‘लाईव्ह’ शेअर करायचे. आणि आपण शेअर केलेले फोटो किती जणांना आवडले याचा हिशोब करत बसायचे. ते सुद्धा काही क्षणार्धात. आपण जर चुटकीसरशी हे करू शकलो नाही तर बेचैन होणारी मुले अनेक ठिकाणी दिसतात.
    यामध्ये भर पडली आहे ती सेल्फी या प्रकाराची. ‘सेल्फी’ म्हणजे स्वत:चा फोटो स्वत:च काढायचा. यातून म्हणे एक प्रकारचा विलक्षण आनंद मिळतो. परंतु खरंतर हा एक प्रकारचा आचरटपणाच आहे. या तंत्रज्ञानाचा आपण कशाप्रकारे वापर करायचा हे आपल्याला समजायला हवे. आपले सेल्फी इतरांनी का म्हणून पहायचे? आपण काहीतरी विलक्षण मोठे काम केले असे तर या तरूणाईला सुचवायचे नसते ना? बरे धोकादायक ठिकाणीच ही सेल्फी काढायची अवदसा कोठून येते? दरीच्या काठावर, धबधब्यात किंवा  समुद्रात असे सेल्फी काढल्याने कोणता आनंद मिळतो?
    प्रीती भिसे नामक एका सतरा वर्षीय युवतीचा मरीन ड्राइव्ह येथे सेल्फी काढताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. आणि त्यानंतर सेल्फी काढताना दुर्घटना घडल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. ही श्रृंखला कुठेतरी तुटावी अशी अपेक्षा असतानाच नागपूरातील वेण्णा सरोवरात आठजण बुडाल्याची बातमी धडकली. विशेष म्हणजे हे सर्वजण सेल्फीच काढत होते. ते होडीतून करत असलेला प्रवास त्यांना फेसबुकवर ‘लाईव्ह ’ करायचा होता. परंतु या लाईव्हच्या नादात आयुष्यच ‘डेड’ झाले त्याचे काय? तरूणांच्या आनंदाच्या, सुखाच्या कल्पनाच बदलल्याचे यातून दिसून येते. कुणीतरी मग नैराश्य आले म्हणून सेल्फी काढत आत्महत्या करतो, तर कुणी आपल्या अत्याचाराचा फेसबुकवर बाजार मांडतो. तरूणांपुढे चुकीचेच आदर्श आपण निर्माण केल्यामुळेच आजची पिढी भरकटत चालली आहे. तांत्रिकदृष्ट्या ‘लाईव्ह’ राहण्याच्या नादात आपले खरेखुरे किंमती आयुष्यच ‘डेड’ करायचे याला अतिउत्साहाचा आचरटपणा म्हणायचे नाहीतर काय?

                                                                                                                                        -- शशांक सिनकर