सावधान, रात्र वैऱ्याची आहे...
पुरोगाम्यांचा एकांगी विलाप
महाराष्ट्रासह देशभरातील पुरोगामी सध्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येबद्दल प्रचंड विलाप करीत आहेत. त्या विलापामागे दु:ख कमी आणि सूडाचीच भावना जास्त असा सारा प्रकार आहे. कारण यामागे सूडभावना नसती तर लागलीच त्यांनी हिंदुत्ववाद्यांना टीकेचे लक्ष्य केले नसते. पण तो त्यांचा जन्मजात गुण आहे. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनीच आता अधिक सजग रहायला हवे. रात्र वैऱ्याची आहे. गौरी लंकेश यांच्या निधनाबद्दल पुरोगाम्यांचा एकांगी विलाप चालू आहे.
कर्नाटकातील दिवंगत ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लंकेश पत्रिका ’ या साप्ताहिकाच्या संपादिका गौरी लंकेश यांची नुकतीच हत्या झाली. त्यादिवशी अनंत चतुर्दशी असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये गणेश विसर्जनाची गडबड सुरू होती. त्यामुळे तसे पाहिले तर महाराष्ट्रात का होईना ही बातमी जरा उशीराच कळली. तोपर्यंत स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात गळे काढण्यास सुरूवातही केली होती. एखाद्या व्यक्तीची हत्या होणे हे दुर्दैवीच आहे. परंतु त्या मेलेल्या माणसाचे निमित्त करून तिच्या चितेवर आपली पोळी भाजून घेणे हेही तितकेच समाजद्रोही आहे. नेमके हेच काम गौरी यांच्या हत्येनंतरही चालूच आहे. ज्याप्रमाणे गिधाडे एखाद्या जनावराच्या मरणाची वाट पहात असतात तद्वत ही पुरोगामी मंडळी एखाद्या विचारवंताची हत्या होते कधी आणि आम्ही हिंदुत्ववाद्यांना जबाबदार धरतो कधी याचीच वाट पहात असतात. गौरी यांच्या बाबतीतही हेच घडून येत आहे. ही हत्या हिंदुत्ववाद्यांनीच केली आहे असा बिनबुडाचा आरोप करण्यास या मंडळींनी सुरूवातही केली आहे.
कोणत्याही हत्येचं समर्थन होऊच शकत नाही. कोणतीही हत्या ही हत्याच असते. मग ती पुरोगाम्यांची असो अगर प्रतिगाम्यांची. हत्येने माणूस संपतो, विचार नाही. मुद्दा असा की, गौरी यांच्या हत्येनंतर समाजमाध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यामध्ये पुरोगाम्यांनी हिंदुत्ववादी संघटनांना टार्गेट केल्याचे दिसताच हिंदुत्वाचे समर्थन करणाऱ्या अनेक पोस्ट या माध्यमांवर फिरल्या. या प्रतिक्रिया निश्चितच हिंदुत्ववाद्यांना अभिमानास्पद वाटत असतीलही. परंतु याचेच भांडवल करीत ही पुरोगामी मंडळी गावभर नाचत सुटली आहेत. त्यांना गौरी यांच्या हत्येबद्दल काहीही सोयरसुतक नाहीये. केवळ गौरी यांच्या हत्येचे निमित्त करून हिंदुत्ववादी विचारांना झोडपायचे आहे. त्यांचे हे स्वप्न सोशल मिडीयावरचे हिंदुत्ववादी विचारवंत आपल्या प्रतिक्रियांतून आयतेच पूर्ण करीत आहेत. त्यामुळे एवढेच सांगावेसे वाटते की, हिंदुत्ववाद्यांनो सावधान रात्र वैऱ्याची आहे.
स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे गौरी यांच्या हत्येवर हसत असतील तर तीही विकृतीच नाही काय? म्हणजे पुरोगाम्यांनी गाय मारली म्हणून हिंदुत्ववाद्यांनी वासरू मारण्यासारखे नव्हे काय? असे असेल तर या विकृतीला हिंदुत्ववाद्यांचे आवरण लावू नका कारण तुम्हाला हिंदु या शब्दाची व्याख्याच कळली नाही असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. आपल्या या अशा कृतीमुळे सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडेच संशयाच्या नजरेने पाहिले जाते. मग तो मालेगावचा बॉम्बस्फोट असो,किंवा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्या असोत.या प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम केलेच ना? हेच तंत्र पुरोगामी तुमच्या या अशा कृतीतून गौरी हत्या प्रकरणात वापरत आहेत. अशा विकृत आनंदाच्या पोस्ट टाकून त्यांच्या हाती आयते कोलीत का द्यायचे?
