फेसबुक ‘लाईव्ह’, आयुष्य ‘डेड’
अतिउत्साही आचरटपणा
प्रीती भिसे नामक एका सतरा वर्षीय युवतीचा मरीन ड्राइव्ह येथे सेल्फी काढताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. आणि त्यानंतर सेल्फी काढताना दुर्घटना घडल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. ही श्रृंखला कुठेतरी तुटावी अशी अपेक्षा असतानाच नागपूरातील वेण्णा सरोवरात आठजण बुडाल्याची बातमी धडकली. विशेष म्हणजे हे सर्वजण सेल्फीच काढत होते. फेसबुक ‘लाईव्ह’ करताना आयुष्यच ‘डेड’ झाले त्याचं काय? असला आचरटपणा करताना सर्वांची कुटुंबे उघड्यावर पडली. तरूणांचं हे ‘सेल्फी’वेड समाजाला घातक तर ठरत नाहीये ना?...
स्वामी विवेकानंदांनी असे म्हटले होते की, मला देशप्रेमाने भारलेले असे केवळ शंभर तरूण द्या, मी हा देश बदलून दाखवेन. सध्याच्या पंतप्रधानांचाही भरवसा युवा पिढीवर जरा जास्तच आहे. देशातील युवकांची संख्या जास्त आहे म्हणून हा देश तरूण असे समीकरण मांडले जात आहे. हे जरी कितीही खरे असले तरीही युवकांना याबाबत काय वाटते हाच खरा मुद्दा आहे. तरुणांची स्वप्ने, त्यांचे आदर्श, त्यांचे विचार हे सर्वच काही एका भक्कम मजबूत अशा साखळदंडाने बांधले आहेत की काय अशी सध्या परिस्थिती आहे. ‘मोबाईल’ नावाचा हाच तो साखळदंड आहे. या मोबाईलमुळे जग जवळ आले असे म्हणतात. परंतु माणसे दुरावत चालली. आजचे युवक एकमेकांशी बोलत नाहीत ते आपला संदेश मोबाईलवर पाठवतात. त्यांच्यात स्पर्धा आहे परंतु ती निकोप नाही. त्यांच्यात असते ती फक्त चढाओढ. मी सर्वांत पुढे असावे अशी प्रत्येक तरुणाचीच धारणा असते. ती काही चुकीची नाही. परंतु केवळ पुढे असून काय उपयोग? त्याने काही जीवनात फरक पडणार आहे का? अशी स्पर्धा जर एखाद्याचा जीव घेणार असेल तर अशी स्पर्धा हवीच कशाला?
सध्या तरुणाईच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत. पूर्वी शिक्षणाच्या संधी फार नसल्यामुळे विद्यार्थी आपल्या घरीच राहून जवळपासच्या शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असे. त्याचा फायदा असा होत असे की, त्यांच्या आईवडिलांना, पालकांना आपल्या पाल्यावर लक्ष ठेवता येत असे. परंतु आता शिक्षणाची दारे सताड उघडली. जगाची क्षितिजे या नवतरुणांना खुणावू लागली. त्यामुळे आपोआपच शिक्षणानिमित्त घराबाहेर राहणे आले. त्यामुळे निरनिराळ्या प्रांतातील विद्यार्थी एकत्र राहू लागल्याने प्रत्येकाची संस्कृती, परंपरा जोपासण्याचा कल वाढू लागला. हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की, या सर्व वातावरणातून मग आठवड्यातून ‘पिकनिक’ची संकल्पना पुढे आली. पूर्वी सहली निघायच्या त्यामध्ये काहीतरी शिकण्याचा, नवीन पाहण्याचा उद्देश असे.परंतु या ‘पिकनिक’ मधून नवीन काही नाही. ना नवे शोध, ना नवे शिक्षण! केवळ आठवडाभर शिक्षण घेतल्यामुळे किंवा काम केल्यामुळे आलेला थकवा दूर करावा एवढाच त्यामागचा उद्देश. हल्ली तरुण म्हणजे ‘उत्साह’ आणि तरुणाई म्हणजे ‘दांडगाई’ एवढेच अर्थ अभिप्रेत आहेत. कामाचा शीण आला म्हणून ‘पिकनिक’ आणि ‘पिकनिक’ आहे म्हणून उत्साह असे समीकरण सध्या चालू आहे. सांगायचा मुद्दा एवढाच की, तरुणांच्या मजेच्या व्याख्या बदलल्यामुळे आपण करू तीच मजा असे त्यांना वाटू लागले आहे. मग आपली मजा इतरांना सांगण्यासाठी अतितत्पर मेसेज सेवा आहेच. आतातर तंत्रज्ञान एवढे पुढारले आहे की, तुम्ही केलेला व्हिडीओ सुद्धा तुम्ही सातासमुद्रापार असलेल्या आपल्या मित्रांना शेअर करू शकता. मग काय तरूणाई लागली कामाला. आपण पिकनिकसाठी कुठे गेलो, काय केलं, काय खाल्ले हे सर्व शुटींग करून व्हॉटसअप किंवा फेसबुकवर ‘लाईव्ह’ शेअर करायचे. आणि आपण शेअर केलेले फोटो किती जणांना आवडले याचा हिशोब करत बसायचे. ते सुद्धा काही क्षणार्धात. आपण जर चुटकीसरशी हे करू शकलो नाही तर बेचैन होणारी मुले अनेक ठिकाणी दिसतात.
यामध्ये भर पडली आहे ती सेल्फी या प्रकाराची. ‘सेल्फी’ म्हणजे स्वत:चा फोटो स्वत:च काढायचा. यातून म्हणे एक प्रकारचा विलक्षण आनंद मिळतो. परंतु खरंतर हा एक प्रकारचा आचरटपणाच आहे. या तंत्रज्ञानाचा आपण कशाप्रकारे वापर करायचा हे आपल्याला समजायला हवे. आपले सेल्फी इतरांनी का म्हणून पहायचे? आपण काहीतरी विलक्षण मोठे काम केले असे तर या तरूणाईला सुचवायचे नसते ना? बरे धोकादायक ठिकाणीच ही सेल्फी काढायची अवदसा कोठून येते? दरीच्या काठावर, धबधब्यात किंवा समुद्रात असे सेल्फी काढल्याने कोणता आनंद मिळतो?
प्रीती भिसे नामक एका सतरा वर्षीय युवतीचा मरीन ड्राइव्ह येथे सेल्फी काढताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. आणि त्यानंतर सेल्फी काढताना दुर्घटना घडल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू झाला. ही श्रृंखला कुठेतरी तुटावी अशी अपेक्षा असतानाच नागपूरातील वेण्णा सरोवरात आठजण बुडाल्याची बातमी धडकली. विशेष म्हणजे हे सर्वजण सेल्फीच काढत होते. ते होडीतून करत असलेला प्रवास त्यांना फेसबुकवर ‘लाईव्ह ’ करायचा होता. परंतु या लाईव्हच्या नादात आयुष्यच ‘डेड’ झाले त्याचे काय? तरूणांच्या आनंदाच्या, सुखाच्या कल्पनाच बदलल्याचे यातून दिसून येते. कुणीतरी मग नैराश्य आले म्हणून सेल्फी काढत आत्महत्या करतो, तर कुणी आपल्या अत्याचाराचा फेसबुकवर बाजार मांडतो. तरूणांपुढे चुकीचेच आदर्श आपण निर्माण केल्यामुळेच आजची पिढी भरकटत चालली आहे. तांत्रिकदृष्ट्या ‘लाईव्ह’ राहण्याच्या नादात आपले खरेखुरे किंमती आयुष्यच ‘डेड’ करायचे याला अतिउत्साहाचा आचरटपणा म्हणायचे नाहीतर काय?
-- शशांक सिनकर