पैशाची लालसा, खोटी प्रतिष्ठा
आजही सीतेने अग्निदिव्य करावे का?
‘यत्र नार्यस्तु पूज्यंते, रमन्ते तत्र देवा:’ असे संस्कार करणाऱ्या या माझ्या संस्कृतीत खरेच स्त्रीयांचा सन्मान केला जातो का? हिंदु धर्मातील अनेक अनिष्ट प्रथा कालौघात नष्ट झाल्या. प्रत्येकवेळी निसर्गनियमा प्रमाणे स्वत: मध्ये बदल करणाऱ्या या हिंदु धर्मात सती सारख्या प्रथा केव्हाच हद्दपार झाल्या. मात्र खोट्या प्रतिष्ठेसाठी चिकटून असलेली हुंडा पध्दत बदलण्याची मानसिकता अजूनही समाजामध्ये जोर धरत नाही. लातुर येथील शितल वायाळ या मुलीने हुंड्याला पैसा नाही म्हणून जीवनच संपविले. रामायणात सीतेला अग्निदिव्य करायला लावणाऱ्या या समाजाला आजही स्त्रीयांनी अग्निदिव्यच करायला हवे आहे काय?
नवनव्या बातम्यांनी रोजचा दिवस उजाडतो. काही बातम्या लक्षात राहतात तर काही आठवतही नाहीत. मात्र काही बातम्या या तुम्हाला अस्वस्थ करून सोडतात. पंधरा दिवसांपूर्वी लातूर तालुक्यातील भिसेवाघोली गावातील शीतल व्यंकट वायाळ या २१ वर्षीय मुलीने तिच्या लग्नासाठी वडीलांना कर्ज मिळत नसल्याने हुंडा कसा द्यायचा या विवंचनेतून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या बातमीने सारा महाराष्ट्रच हेलावला. या घटनेला आज पंधरा दिवस झाले. या पंधरा दिवसात अनेकांची लग्ने झाली. तेथील थाटमाट पाहून डोळे दिपत होते. समाजाचे मन मेल्याचेच हे लक्षण नव्हे काय? ज्या कारणासाठी शीतलने आत्महत्त्या केली तीच हुंडा पध्दत या ना त्या कारणाने आजही आपण स्विकारतो हे कशाचे द्योतक आहे?
समाजातील खोटी प्रतिष्ठा, अनावश्यक स्पर्धा, आपापसातील चढाओढ या साऱयां मुळे लग्न हा एक संस्कार न राहता तो कुप्रथेकडेच जास्त झुकत चालल्याचे आज तरी दिसत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तर मुलाच्या कमाईनुसार त्याचे हुंड्याचे दरपत्रक ठरलेले असते. साधा पदवीधर असलेला मुलगाही या लग्नाच्या बाजारात हुंड्याच्या रूपाने आपली लाखोंची बोली लावतो. त्याच्या लक्षात येत नाही की त्याला कळत नाही नकळत तो या बाजारात विकला जातो. हुंडा म्हणजे जिवंत माणसाची खरेदी विक्रीच नव्हे काय? या जिवघेण्या स्पर्धेचा ओघ श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत वहातच असतो. हुंडा ही एक परंपरा आहे आणि आपण ती पाळलीच पाहिजे असे निर्लज्ज समर्थनही यावेळी समाजातील काही महाभाग करतच असतात. जेवढा हुंडा जास्त तेवढी प्रतिष्ठा जास्त अशी एक स्वार्थी विचारसरणी समाजामध्ये जोर धरू पहात आहे. वास्तविक ही विचारसरणी नष्ट झाली पाहिजे परंतु जसा काळ बदलतो तशी ही विचारसरणी अधिकाधिक जोर धरू पहाते. ही विचारसरणी नसून एक प्रकारचा सामाजिक अविचारच आहे.
हुंड्यापायी अमानुषपणे नववधुंची होत असलेली हत्या हा भारतीय संस्कृतीला लागलेला डाग आहे. हुंडा हा वरपक्षाची प्रतिष्ठा वाढविणारा मोजकाटाच आहे. पूर्वीच्या काळची स्त्रीधन ही कल्पना मधल्या काळात हुंडा प्रथेकडे कशी परावर्तीत झाली हे कळलेच नाही. आता मात्र ही प्रथा म्हणजे एक भयानक सामाजिक रोग झाला आहे. आज एकविसाव्या शतकातदेखील काही पुरूष हुंड्याच्या लालसेने आपल्या पत्नीला धगधगत्या ज्वालांमध्ये लोटून देतात, विष देऊन हत्या करतात किंवा तीला आत्महत्येस प्रवृत्त करतात. मुलीचा साधा जगण्याचा हक्कही सासरकडून हिरावला जातो. नादान किंवा
नाकर्ते पुरूष आपले नाकर्तेपण झाकण्यासाठी किंवा आपले चोचले पुरविण्यासाठी वरदक्षिणा मागतात. यावेळी त्यांच्या मनात कोणताही अपराधीपणाचा भाव उमटत नाही. हीच मुले मात्र नंतर पुरूषीपणाचा अहंकार जोपासताना दिसतात.
शितल वायाळने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत विचारलेले प्रश्न केवळ एका समाजापुरतेच मर्यादीत नसून अखंड पुरूष जातीला विचार करायला लावणारे आहेत. शेवटी एकच,.कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा उपाय होवू शकत नाही. हुंडाविरोधी अनेक कायदे असूनही समाजात वारंवार अशा घटना घडतात याचे कारण कायद्यात पळवाटाही तितक्याच आहेत. या पळवाटा शोधण्यापेक्षा तरूणांनी आपली मानसिकता बदलणे हेच गरजेचे आहे. कायम अग्निदिव्य सीतेनेच का करावे?
- शशांक सिनकर
